परिवहन मंडळाचा अनोखा उपक्रम : प्रवाशांना दर्जेदार सेवेची ग्वाहीप्रशांत देसाई - भंडाराप्रवाशांना अविरतपणे सेवा देणाऱ्या एस.टी. बसेस तांत्रिक अडचणीमुळे खिळखिळ्या झाल्या आहेत. यातील काही बसेस पावसाळ्यात गळतात. त्यामुळे प्रवाशांची ओरड असल्यामुळे त्यात सुधारणा व्हावी, याकरीता राज्य परिवहन मंडळ सरसावले आहे. आता प्रवाशांना योग्य प्रमाणात बसेस उपलब्ध असल्या तरी गळतीच्या बसेस असल्यास ते दाखवा व मोबदल्यात एक हजार रूपयाचे बक्षिस मिळवा, असे परिपत्रक अलिकडेच निर्गमित झाले आहेत. मागील ७५ वर्षांपासून राज्य परिवहन मंडळाचा ‘गाव तिथे एस.टी.’ हा उपक्रम सुरू आहे. महामंडळाच्या या बसेसने राज्यात तसेच आंतरराज्यात प्रवाशांची वाहतूक केली जाते. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रयत्न केले जातात. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून प्रवाशाच्या सेवेसाठी चांगले वाहन देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी परिवहन मंडळ वाहनांचे यांत्रिक स्थिती चांगली असण्याबरोबरच वाहनांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.पावसाळ्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गळतीचे प्रमाण असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्रापत व्हायच्या. त्याबाबत या तक्रारी न येण्यासाठी एस.टी. गळणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये एस.टी. न गळण्यासाठी करावयाच्या कामा संबंधीच्या सुचना यंत्र अभियांत्रिकी खात्यामार्फत प्रसारीत करून वाहनाची देखभाल दुरूस्ती करण्यात आली. या सुचनांची अंमलबजावणी झाल्यास गाड्यांची गळतीची तक्रारी राहणार नाही व त्यामुळे राज्य परिवहन मंडळाची प्रतिमा उंचावण्यासाठी मदत होईल. यादृष्टीकोनातून राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी औरंगाबाद, नागपूर व पुणे येथील कार्यशाळांना व आगारप्रमुख व विभागप्रमुखांना परिपत्रक पाठवून बसमधील गळतीचे प्रमाण थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत.या सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे व बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही पद्धतीचा त्रास किंवा पावसाचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने सर्वांना निर्देश देण्यात आले आहे, त्याची अंमलबजाणी करण्यात आली आहे. आजही अनेक एस.टी. आगारात जुन्या बसेस असल्यामुळे त्यांची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद झाली नसल्यामुळे याची अंमलबजावणी करण्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळ कितपत यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गळती बस दाखवा... एक हजार रूपये मिळवा
By admin | Updated: July 24, 2014 23:42 IST