भंडारा : माध्यमिक शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वी ची मुले हा अत्यंत महत्वाचा उत्साही वर्ग आहे. यामुळे शासनाने या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात शालेय डेंग्यू जागृती मोहीम १५ जुलै २०१४ पर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये डेंग्यू या आजाराची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरीता वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक/सेविका, अवैद्यकीय पर्यवेक्षक यामधून संवाद कौशल्य असलेले व्यक्तींची संवादक म्हणून निवड करुन प्रत्येक शाळांच्या संख्येनुसार प्रा.आ.केंद्र तसेच तालुका स्तरावर शालेय डेंग्यू जागृती मोहिमेसाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना संवादकाच्या माध्यमातून प्रभावी आरोग्य शिक्षण देण्याचे आरोग्य विभागाने ठरविलेले आहे. सोबतच विद्यार्थ्यांना डासमुक्तीची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे.डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगूचा प्रसार एडिस एजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमुळे होतो. डेंग्यूची लक्षणे- तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, अंगावर लालसर रॅश/पुरळ, तीव्र पोटदुखी, गंभीर रुग्णास प्लेटलेट कमी झाल्याने रक्तस्त्राव होतो. उपाय- डेंग्यूवर कोणताही नेमका औषधोपचार उपलब्ध नाही. तापासाठी पॅरासिटॅमाल, भरपूर पाणी पिणे, विश्रांती, लक्षणेनुसार उपचार करणे आहे.या आजाराच्या नियंत्रणासाठी एडिस डासाची उत्पत्ती रोखणे हा प्रतिबंधक उपाय आहे.एषडीस डासाची उत्पत्ती कशी रोखावी:-परिसर स्वच्छता: सदर डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. रांजणातील पाणी, सिमेंटच्या टाक्यातील पाणी, इमारतीवरील टाक्यातील पाणी, घरासभोवतालच्या टाकावू वस्तू उदा. प्लॅस्टीकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर्स इत्यादीमध्ये कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवल्यास डास अंडी घालून उत्पत्ती होते. तेव्हा अशा निरुपयोगी वस्तुमध्ये पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत. पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकत नाहीत. तसेच अंड्यांची वाढ होण्यासाठी हवा, प्रकाश मिळू शकत नाही. घरांवरील टाक्यांना झाकणे बसवावीत. शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवावीत. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा. परिसरातील डबकी वाहती करणे, बुजविणे, मोठ्या डबक्यात गप्पी मासे सोडणे महत्वाचे आहे.जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत, उदा. सिमेंटचे कंटेनर अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळीनाशकाचा वापर करवा.किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण कसे करतात:- एडिस डास अळी शोधण्यासाठी घरातील व घरासभोवतालचे पाणी साठे तपासून गृह निर्देशांक काढण्यात येतो. पाणी साठे मोकळे करावेत, परंतु ते गटारात न ओतता जमिनीवर ओतावे. पाणीसाठा मोकळा करणे शक्य नसल्यास त्यात अळी नाशकाचा वापर करावा. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास पाणी गाळून घेऊन ते पाणी पुन्हा वापरावे. तत्पूर्वी ते भांडे स्वच्छ फडक्याने घासून पुसून ठेवावे. (नगर प्रतिनिधी)
शालेय डेंग्यू जागृती मोहीम
By admin | Updated: July 5, 2014 00:17 IST