भंडारा
: येत्या खरीप हंगामासाठी २१ हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यात केवळ १0 हजार क्विंटल बियाणांचा साठा असल्याने शेतकर्यांना बियाणांची तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. अतवृष्टीमुळे फटका बसलेल्यांना शेतकर्यांकडून बियाणांची मागणी वाढली असतानाही कृषी विभागाचे अधिकारी बिनधास्त आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भंडारा
जिल्ह्यातील दोन लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाचे पीक घेतले जाते. यातील धान पिकाखालील क्षेत्र १ लाख ६५ ते ७५ हजार हेक्टर आहे. कृषी विभागाने २१ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली. मात्र महाबिजने १0 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केला आहे. अन्य कंपन्यांकडूनही बियाणांचा पुरवठा करण्यात येत असला तरी बियाणांची मागणी वाढली आहे. साठय़ाचे प्रमाण कमी असल्याने बियाणांचा तुटवडा सहन करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. महाबिजतर्फे
आर.आर.आर. आणि डी.आर.आर. हे वाण उपलब्ध करून दिले जात आहे. एम.पी.यु. १0१0 वाणांचे बियाणे, एमपीयु १00१, आरआय ६४, श्रीराम आदी वाणांचे बियाणे बाजारात आले आहेत. शेतकर्यांमध्ये लोकप्रिय असलेले जेजीएफ १७९८, सुधारित संबा मुसरी एमटीयू १0७५ आणि एचएमटी हे वाण अनुदानावर उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. महाबीजशिवाय यशोदा, महागुजरात आणि दप्तरी कंपन्यांचे बियाणे शेतकर्यांना उपलब्ध होत आहेत. खरीप हंगामासाठी सोयाबीनचे २१00 क्विंटल आणि तुरीचे ४२१ क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने संबंधित कंपन्यांकडे केली आहे. सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात मिळण्याची शक्यता आहे. शेतकर्यांना सेंद्रीय शेतीसाठी महाबिजने ढेंचा व सोनबोरूचे बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे रासायनिक खताचा कमी वापर करणार्या शेतकर्यांना या बियाणांचा लाभ मिळविता येईल. बियाणांचा
तुटवडा असल्याने शेतकरी खासगी दुकानातून तूर बियाणे खरेदी करीत आहेत. मागीलवर्षी खासगी कंपन्यांकडून शेतकर्यांची फसगत झाल्यामुळे शासनाकडून सवलतीच्या दरात मिळणार्या बियाणांवर शेतकर्यांची भिस्त होती. परंतु बियाणांचा तुटवडा जाणवू लागल्याने शेतकर्यांची भटकंती सुरु आहे. (नगर प्रतिनिधी)