तुमसर : उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधनाला अधिक महत्व दिले जाते. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग भरीव अशी आर्थिक तरतूद करीत आहे. परंतू संशोधनाचा दर्जा पाहिले तसा निश्चितच नाही, कारण संशोधक प्राध्यापकांमध्ये संशोधन प्रवृत्तीचा अभाव दिसून येतो. ही संशोधन प्रवृत्ती प्राध्यापकांमध्ये महाविद्यालयाने सुरू केलेल्या संशोधन पद्धतीशास्त्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून निर्माण व्हावी, यासाठी अभ्यासक्रम सुरू केला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सी.बी. मसराम यांनी केले.स्थानिक एस.एन. मोर कला, वाणिज्य व जी.डी. सराफ विज्ञान महाविद्यालय तुमसर येथे नागपूर विद्यापिठाच्या निरंतर, प्रौढ शिक्षण व विस्तार विभागाच्या अभ्यासमंडळाद्वारे संशोधन पद्धतीशास्त्र कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटक म्हणून डॉ. भरत मेघे, अतिथी म्हणून डॉ.दीपक पवार, राहूल भगत उपस्थित होते.याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना डॉ. मेघे म्हणाले की, विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पीएचडी करण्यासाठी संशोधन पद्धतीशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक अट आहे. परंतू हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अभ्यासकेंद्राची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. विद्यार्थीची अडचण मोर महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम सुरू करून दूर केलेली आहे. यावेळी दिपक पवार यांनी गुणवत्तापूर्ण संशोधन बाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. राहूल भगत यांनी, संचालन डॉ. आर.के. दिपटे यांनी तर आभार डॉ.एम.एफ. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कोमलचंद साठवणे, डॉ.जाधव, दिपटे, प्रकाश देहलीवाल, मुरली लांबट, सुनिल कानोलकर, राहुल भगत, अशोक मेश्राम, रमेश गायधने, योगेश देशभ्रतार, आनंद मलेवार व संदीप चामट यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
प्राध्यापकांमध्ये संशोधन प्रवृत्ती निर्माण होणे आवश्यक
By admin | Updated: September 4, 2014 23:36 IST