शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था : महा. राज्य प्राथ.शिक्षक संघाचा विरोधभंडारा : घडलेल्या गुन्ह्यात गावकऱ्यांना पंच म्हणून घेत होते. परंतु हे पंच बयाण बदलवित असल्याने गुन्हेगाराला सजा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आता घटनास्थळाजवळ असलेल्या शाळेच्या शिक्षकांना पंच म्हणून उपस्थित रहावे लागणार आहे. मात्र, शिक्षणाचे कार्य सोडून शिक्षकांना या कामात गुंतवू पाहण्याच्या प्रकाराला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने विरोध केला आहे.राज्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज गुन्हे घडत असल्याने गृह विभागाचे वचक नसल्याचा प्रकार समोर येत आहे. आतापर्यंत पोलीस विभाग घडलेल्या गुन्ह्यासाठी पंच म्हणून घटनास्थळावर उपस्थित नागरिकांची साक्ष ग्राह्य पकडून प्रकरण न्यायदानासाठी न्यायालयात सादर करीत होते. मात्र, बऱ्याच प्रकरणात पंचांनी न्यायालयात साक्ष बदलविल्याचा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे गुन्हेगाराला अभय मिळत असल्याने ते न्यायालयातून निर्दोष सुटत असल्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.त्यामुळे गृह विभागाने आता गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाजवळील शाळेतील शिक्षकांची गुन्ह्यात पंच म्हणून उपस्थित ठेवण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी पंच म्हणून शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत पोलिसांकडून दबाव आणला जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गृह विभागाकडून असा प्रकार अवलंबिला जात असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)शिक्षक हे ग्रामविकास, नगरविकास व शिक्षण विभागाचे कर्मचारी आहेत. गृह विभागाचे नाहीत. त्यामुळे गृहविभाग शिक्षकांवर सक्ती करू शकत नाही. शिक्षण विभागाने असे कुठलेही आदेश दिलेले नाही. शिक्षकांना शिक्षणाशिवाय अन्य जबाबदारी लादू नये. शिक्षकांनी याला विरोध करावा.- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महा. राज्य. प्रा. शिक्षक संघ भंडारा.
आता गुन्ह्याच्या तपासात शिक्षक बनणार पोलिसांचे ‘पंच’!
By admin | Updated: July 25, 2016 00:34 IST