शिक्षक दिन : विद्यार्थ्यांसाठी स्वत: खर्च करतात पैसे तुमसर : सामाजिक कार्य, शैक्षणिक उपक्रम, स्थानिक लौकिक, तथा सामाजिक प्रश्नासंबंधी लेखन असे निकष असणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जात असले तरी शिक्षणासह विद्यार्थी घडविण्यासाठी महिन्याकाठी स्वत:जवळचे पैसे खर्च करुन शिकविणारे शिक्षक आजही बेदखल आहेत.दावेझरी टोला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अ.वा.बुद्धे कार्यरत आहेत. तरुण असलेले बुद्धे यांनी ग्रामीण परिसरातील उमरवाडा, दावेझरी टोला, देव्हाडी, माडगी, कोष्टी, भंडाराजवळील कारधा, कोरंभी येथील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा प्रबोधिनी करीता वर्षभर विविध उपक्रम राबवून पुणे, अमरावती, गडचिरोली व औरंगाबाद येथे खेळाडू व शिक्षणाकरीता प्रवेश मिळवून दिला. शासनाच्या निकषासह निकष त्यांनी पूर्ण केले. परंतु त्याची दखल शिक्षण विभागाने घेतली नाही. पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपावेतो विद्यर्थ्यांकरीता उपलब्ध होणारे व महिन्याला १० हजार रुपये खर्च करणारे ते कदाचित जिल्ह्यात एकमेव असतील. क्रीडा प्रबोधिनीतील त्यांचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळले असून पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कामगिरी करावी असे स्वप्न आहे. सन २०१२-१३ सत्रात राज्यात क्रीडा प्रबोधिनीकरीता देव्हाडी येथील स्व. फत्तूजी बावनकर क्रीडा मार्गदर्शन केंद्रातून ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. क्रीडा प्रबोधिनीत इतक्या संख्येने निवड होणारे हे एकमेव केंद्र ठरले आहे. तत्पूर्वी क्रीडा प्रबोधिनीने निवड निकष बदलविल्याने विद्यार्थी वंचित ठरले होते. आदर्श शिक्षक पुरस्काराची महत्ता दिवसेंदिवस योग्य शिक्षकांना तो पुरस्कार मिळत नसल्याने कमी होत असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
खेळाडू घडविणारा शिक्षक बेदखल
By admin | Updated: September 4, 2014 23:35 IST