भंडारा : लिलाव झालेल्या आणि लिलाव न झालेल्या रेतीघाटातून वाळूचा बेसूमार उपसा सुरू आहे. रात्रंदिवस वाळूचा उपसा सुरू असल्यामुळे वाळू माफियांनी सारे नियम धाब्यावर बसवून वाळू माफियांनी गोसेखुर्दच्या संरक्षक भिंतीलाच रेतीचे ‘डम्पिंग यार्ड’ बनविले आहे. जनतेसाठी बांधलेली संरक्षक भिंत जनतेच्या उपयोगात येत नसली तरी वाळू माफियांसाठी मात्र हा रिंगरोड ‘आश्रयस्थान’ ठरत आहे. नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी धीरजकुमार या वाळू माफियांवर कोणती कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.वैनगंगा नदीची रेती उत्कृष्ट दर्जाची असून या रेतीला नागपूरसह अन्य जिल्ह्यातही मोठी मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीघाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. सुर्योदय ते सुर्यास्त असा रेती उपसा करण्याचा नियम आहे. परंतु, वाळू माफिया रात्रंदिवस रेतीचा उपसा करतात. त्यामुळे ही रेती साठवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे या तस्करांनी उपयोगात नसलेल्या संरक्षक भिंतीला चोरीच्या रेतीचे केंद्र बनविले. रेतीचा हा साठा जेसीबीच्या माध्यमातून ट्रकांमध्ये भरून जमा केला जातो. हा प्रकार यापूर्वी ‘लोकमत’ने उघडकीस आणून दिल्यानंतर महसूल विभागाने थातुरमातुर कारवाई केली. त्यानंतर ‘आपण सारे भाऊ मिळून खाऊ’ असे म्हणत आठ दिवसातच हा चोरीचा धंदा सुरू झाला. (शहर प्रतिनिधी)भिंत कशासाठी?गोसेखुर्द धरणाच्या ‘बॅक वॉटर’मुळे भंडारा शहराला धोका निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने टाकळी ते गणेशपूरपर्यंत संरक्षक भिंंत बांधण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सहा किमी लांबीच्या या संरक्षक भिंतीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. नदीघाटावरून टिप्परच्या सहाय्याने ही रेती याठिकाणी आणली जात आहे. आता या भिंतीवर अंदाजे दोन किमीच्या परिसरात रेतीचे ढिगारेच ढिगारे दिसून येत ही भिंत कुणासाठी बांधली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इथे आहे रेतीसाठा भंडारा-वरठी मार्गावरील टाकळी वीज वितरण कार्यालयामागील मोकळी जागा, रिंग रोड, पिंगलाई, खोकरला, जमनी या भागात रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली आहे. साठविलेल्या रेतीची मध्यरात्री जेसीबीने ट्रक व टिप्परमध्ये रेती भरून नागपूरकडे पाठविण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा नित्यनेमाने सुरु आहे. नियमांची पायमल्लीरेती उत्खननाबाबत राज्य शासनाने नियम बनविले आहे. यात सकाळी सहा ते रात्री सहापर्यंत रेतीचे उत्खनन करून वाहतूक करता येते. रेतीची साठवणूक करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई केल्या जाते. मात्र, रिंगरोडवर हजारो ब्रास रेतीची साठवणूक करून ढिगारे असतानाही जिल्हा व महसूल प्रशासन साखरझोपेत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून अपेक्षानव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांनी पदभार स्वीकारला आहे. कर्तव्यदक्ष अशी ख्याती असेल तर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा बसविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाही तर आतापर्यंत जसे चालले तसाच कारभार राहणार यात शंका नाही.
संरक्षक भिंत नव्हे रेतीचे ‘डम्पिंग यार्ड’
By admin | Updated: May 24, 2015 01:11 IST