शहापूर : पावसाचा जोर वाढला असल्याने ग्रामीण भागात तात पिकाची रोवणी जोरात सुरू आहे. परंपरागत शेतीला फाटा देत शेतकरी यांत्रिक युगाकडे वळला आहे. त्यामुळे वाढलेल्या पऱ्ह्याची रोवणी करण्याकरीता शेतात करण्यात येणारी चिखलणी लाकडी नांगरी व फणा ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाते.शेतशिवारातून चिखलणी करुन बाहेर पडलेले ट्रॅक्टर मातीसह रस्त्याने नेले जातात. ग्रामीण भागातील बहुतांशी गावे एकमेकांना डांबरी रस्त्यांशी जोडलेले आहेत. शेतातून काढलेले ट्रॅक्टर अशा रस्त्यावरुन नेताना चालकांना वेगळाच आनंद मिळत असावा असे वाटते. मातीसह शेतातून निघालेला ट्रॅक्टर वेगात चालविला की ट्रॅक्टरला लागून असलेली माती एका विशिष्ट गोलाकार आकारात उडत असते. त्यामुळे ट्रॅक्टरची मातीही निघते व चालकाचे मनोरंजनही होते. याचा फटका मात्र अशा रस्त्यावरुन ये-जा करणारे पादचारी, दुचाकी चालक व इतरांना बसत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून जवळपास सर्वच गावात सिमेंट वा डांबराचे रस्ते तयार झाले आहेत. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून इतर गावांना जाणारे रस्ते सुद्धा डांबरीकरण झालेले आहेत. मात्र यातील गावात असणारे मुख्य मार्ग व शेतशिवारातील असे रस्ते चिखलाने माखलेले आहेत. दरवर्षी पेक्षा यावर्षी पावसाची सरासरी कमी असल्याने शेतकरी जसा पाऊस पडतो तशी रोवणी लवकर आटोपण्याच्या घाईत आहे. त्यामुळे पूर्णपणे न जलावलेल्या शेतातून ट्रॅक्टरसोबत माती रस्त्यावर येण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील काही पक्के रस्ते अक्षरश: मातीने व चिखलाने झाकली गेली आहेत. त्याचा फटका मात्र ग्रामस्थांना व आवागमन करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
ग्रामीण रस्ते चिखलाने माखले
By admin | Updated: August 5, 2014 23:21 IST