खराशी : भारत सरकार वित्त विभागातर्फे स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत पंतप्रधान फी परत या योजनेनुसार सेक्युरिटी नॉलेज अँड स्कील डेव्हलपमेंट काऊन्सील या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाचा सामाजिक उपक्रम शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला असून नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला. विवेकानंद विद्यालय येथे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून एनएसडीसीचे जिल्हा संघटक अध्यक्ष शशीकांत भोयर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संघरत्न डोंगरे, पं.स. सदस्य लिलाधर चेटुले, दिघोरीचे सरपंच शंकर खराबे, भास्कर चेटुले, श्रावण शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डमदेव कहालकर यांनी ग्रामीणण भागातील बेकारी दुर व्हावी, त्यांना रोजगाराविषयी माहिती मिळावी, स्वस्थ समाजनिर्मिती व राष्ट्रसंताच्या विचारातून प्रेरणा घेऊन सबंध मानव जातीचा कल्याण व्हावा या संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणातून शशीकांत भोयर यांनी एनएसडीसी या शासनाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांंना कसा होईल याबाबद मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या उपक्रमाबद्दल डमदेव कहालकर यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी संघदीप डोंगरे यांनीही मार्गदर्शन केले. भाष्कर चेटुले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर पोवाडा सादर केला. यावेळी प्रशिक्षणातील महत्वाच्या बाबींचे प्रात्यक्षिक सादर करुन प्रशिक्षणाचा उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विद्यार्थी-पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रुपचंद उपरीकर, प्रेसिता कहालकर, भास्कर शेळके, हेमंत इलमे यांनी सहकार्य केले. संचालन प्रा. पृथ्वीराज मेश्राम आभार त्रिवेणी कहालकर यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)
सेक्युरिटी गार्ड प्रशिक्षणाचा शुभारंभ
By admin | Updated: May 22, 2014 00:53 IST