साकोली : तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात या अनेक असुविधा तुमचे स्वागत करतील. इथे कामासाठी आलेल्या कॉमन मॅनला साधी बसण्यासाठी जागाही नाही हे तर सोडाच पावसाळ्यात त्याला उभे राहण्यासाठी जागाही नाही. तर वाहन ठेवण्यासाठीही पार्कींगची जागा नाही. हे पाहता असे वाटते की ही कॉमन मॅनची जणू थट्टाच आहे. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. साकोली, लाखनी, लाखांदूर या तिन्ही तालुक्याचा कारभार ज्या उपविभागीय कार्यालयातून चालतो त्या कार्यालयात दररोज हजारो लोक काही ना काही कामासाठी येतात. मात्र येथे आल्यानंतर नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी एक माठ ठेवला आहे. त्यातील पाणी नागरिकांना व कर्मचाऱ्यांना प्यावे लागते. या कार्यालयात मोजक्याच खुर्च्या असून या खुर्च्या सर्वसामान्य नागरिकांना बसण्यासाठी दिल्याच जात नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना तातकळत उभे राहावे लागते. या कार्यालयाच्या परिसरात एक शौचालय आहे. मात्र त्याची अवस्था इतकी खराब आहे की त्यात जाण्यासाठी नागरिक पसंत करीत नाही. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नाही. त्यामुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच या कार्यालयात येणाऱ्यांची दुचाकी व चारचाकी वाहन पार्कींग करण्याचीही मोठी अडचण आहे. कार्यालय परिसरात जागा नसल्याने कामासाठी येणाऱ्यांना आपली वाहने रस्त्यावरपार्क करावी लागतात. तर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सौंदर्यीकरणाचाही अभाव आहे.नवीन इमारतीचे भिजत घोंगडेया सर्व अडचणींना दूर करण्यासाठी साकोली येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय गडकुंभली रोड किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या मागे असलेल्या जागेवर बांधण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात आले. यासाठी तत्कालीन तहसीलदार राजू रणवीर यांनी पुढाकार घेऊन नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांची अशी मागणी आहे की हे कार्यालय याच ठिकाणी नव्याने तयार करण्यात यावे. मात्र अपुऱ्या जागेमुळे प्रशासनातर्फे कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढावा व प्रशस्त अशी सर्व सोयीयुक्त इमारत तयार करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोली मुख्यालयात सुविधांचा अभाव
By admin | Updated: July 24, 2014 23:44 IST