येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय इमारत बांधकामाला मंजुरी मिळून इमारत बांधकामाला सुरुवात होऊन ते पूर्णत्वास येत आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीमध्ये नगर पालिकेचे संपूर्ण कारभार याच इमारतीतून होणार आहे व एकाचवेळी हजारोंच्या संख्येने कर्मचारीगण, अधिकारी व शहरातील नागरिकांचे आवागमन होणार असताना मात्र सदर इमारत ही अंदाजपत्रकाला डावलून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम होत असताना प्रशासनाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे.
परिणामी भविष्यात या इमारतीत मोठी दुर्घटना वा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ४ कोटी रुपयांचा - मे. सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनी, तिरोडा, इंटिरिअर व रिनोव्हेशन बांधकाम २ कोटी रुपये, ए ग्लोबल क्रिएशन नागपूर तर इलेक्ट्रिक फिटिंग १.५० कोटी रुपये मे. सोम. इलेक्ट्रिक नागपूरला कंत्राट देण्यात आले आहे. असा एकूण या इमारतीवर साडेसात कोटी रुपयांचा खर्च होत आहे. मात्र अजूनपर्यंत इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण, माती परीक्षण, लोखंडी बांधणीचा नकाशा संरचनात्मक केले गेले नाहीत. इमारतीचे संपूर्ण बांधकाम, इंटेरिअर, इलेक्ट्रिक फिटिंग आधी कामे निकृष्ट दर्जाचे करून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. परिणामी पूर्णत्वास येत असलेले बांधकाम तत्काळ बंद करून पाच सदस्यीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे, तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे, शहराध्यक्ष राजेश देशमुख, सुनील थोटे, प्रदीप भरणेकर, यासीन छवारे, योगेश सिंगनजुडे, नगरसेवक सलाम तुरक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.