पालांदूर : परिसरातील शेतकऱ्यांनी धान शेतीला पुरक जोडधंदा म्हणून पाजीपाला पिकांची लागवड केली आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भेंडीवर हळद्या व बुरशी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.या रोगांपासून भेंडी तथा अन्य पालेभाज्यांचा बचाव करता यावा, यासाठी कृषी अभ्यासक मंगेश भिवगडे यांनी भेंडी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी, बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी शेतपिकात बदल घडवून जमिनीचे आरोग्य अबादीत राखत विकते तेच पिकवण्याचा सल्ला दिला. भेंडी पिकावर हळद्या व बुरशीचा प्रभाव जाणव आहे. यामुळे उत्पन्नावर व दर्जावर नकारात्मक परिणाम होत असून वेळीच उपचाराचे धडे थेट बांधावर शेतकऱ्यांना दिले.शेतकऱ्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवुन सतत अभ्यासात्मक नजर ठेवावी. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष पिकाशी केलेली मैत्री अभ्यासात भर पाडून देते. आपले अनुभव आपल्या शेतकरी बांधवांना आदान-प्रदान करुन शेती करावी. शक्यतो बाजारात कोणत्या पिकाला मागणी आहे. याचा सारासार विचार अभ्यास करुनच पिक निवडावे. खताच्या मात्रा पिकनिहाय वेगवेगळ्या असतात. गरजेपेक्षा अधिक खताच्या मात्रा पिकाकरिता, जमिनीकरिता घातकच आहेत. खेड्यात पिकवून शहरात विकण्याकरिता गटशेतीने मदत होते. पर्यायाने शेतकरी बांधवांना आर्थिक उन्नती साधायला मोठी मदत होते असे कृषि अभ्यासक भिवगडेंनी समाधान व्यक्त केले.वांगे पिकाला पोकळणाऱ्या अळींचा त्रास वाढला आहे. तापमानामुळेही फुलांची गळती सुरु आहे. बाजारात थोक विक्रीला भाव नसल्याने माल तोडणे वाहतुक खर्च निघणे दुरापास्त झाल्याने भेंडी उत्पादक शेतकऱ्यांनी भेंडीचा तोडा बंद केला आहे. भेंडीचे थोक भाव तीन ते पाच रुपये प्रतिकिलो आहे. चवळी (गोमती) पाच ते आठ, गवारशेंग आठ ते बारा, ढेमस १०-१२, वांगे चार ते सहा रुपये असल्याची अद्यावत माहिती भिवगडेनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी नितीन ठवकर, मंगेश राघोर्ते, क्रिष्णा देशमुख, मार्र्कंड लांजेवार, गोपाल नगरकर, क्रिष्णा पराते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
भेंडी पिकावर हळद्या व बुरशींचा प्रादुर्भाव
By admin | Updated: May 23, 2015 01:12 IST