भंडारा : देशाने व राज्याने विविध क्षेत्रांत प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रगती केली असून प्रशासनात सुद्धा महिलांच्या प्रगतीचा आलेख अभिमानास्पद आहे. विविध क्षेत्रांतील सर्वांगीण विकासात महिलांचे अतुलनीय योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.
महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित राष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे, गटविकास अधिकारी नूतन सावंत, डॉ. माधुरी माथूरकर व गौरव तुरकर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत काम करत असताना महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर महिला नेहमीच खऱ्या उतरल्या आहेत. कार्यतत्पर व प्रामाणिक ही महिलांची गुणवैशिष्ट्ये आहेत. आपले कर्तृत्व सिद्ध करताना आपल्यातील वैशिष्ट्य लुप्त होता काम नये. आपल्यातील वैशिष्ट्ये ओळखा, ते कायम जपा, असा सल्ला मीनल करनवाल यांनी महिलांना दिला. प्रास्तािवक मनीषा कुरसंगे यांनी केले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभिमानाचा’ शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. महिला बचतगट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले. कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी फेटे बांधले होते.
बॉक्स
उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव
महिलांचा निवडणुकीमध्ये माध्यामातून जनजागृती केल्याबद्दल महिला पत्रकार कविता नागापुरे व श्रद्धा पडोळे, मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल साकोलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, आशासेविका किरण रमेश सूर्यवंशी, ज्योती महिपाल बैस, वनश्री चंद्रहास चव्हाण, धनश्री बांगलकर, मनीषा गजभिये यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला. त्यात योगिता परसमोडे तुमसर, जसुदा पुराम पवनी, शारदा वाकोडीकर पवनी, भंडारा येथील सुधा कालेश्वर, छाया ढोरे, अर्चना किंमतकर, वर्षा मेंढे, अर्चना ढेंगे आंधळगाव, नलिनी पाथोडे साकोली, कविता डोंगरवार कारधा, संगीता रामटेके कारधा, ममता लोहकरे पवनी, विद्या वाघमारे पवनी, मनीषा गजभिये तुमसर, नलिनी आकरे, छाया बुरडे, धनश्री नेवारे, मंगला गभने, हिरकनी खोब्रागडे, सीमा ठवकर, आशा वाढई, स्नेहलता बन्सोड, सारंगा उके, चेतना मळकाम, रज्जू कुकडे, गायत्री गायधने, शुभांगी गभने, प्रतिभा राखडे मोहाडी, पदमा जोशी यांचा समावेश आहे.