देवानंद नंदेश्वर लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सरकारी पगार असतानाही लोकसेवक सामान्य लोकांकडून लाच स्वरूपात पैसे घेतात. याच्या तक्रारी प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून कारवाया केल्या जातात. जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ८ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात लाच घेण्यात महसूल विभाग पहिल्या स्थानावर असून, भूमी अभिलेखचा दूसरा क्रमांक लागतो. इमानदारी संपली का? सरकारी पगार पुरेना, अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे.
लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही अधिकारी, कर्मचारी सामान्यांची नियमात असणारी कामे अडवतात. त्यांच्याकडून अगदी ३०० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत लाचेची मागणी करतात; परंतु काही सुजाण नागरिक या लाचखोर लोकसेवकांची 'एसीबी'कडे तक्रार करतात. येथील पथक सर्व शहानिशा करते. त्यानंतर मग पडताळणी करून सापळा लावतात आणि लाच घेताच त्याला पकडतात. २०२४ या चालू वर्षात 'एसीबी'ने ८ कारवाया करून मासे गळाला लावले आहेत. शासकीय कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांकडून कुठल्याची प्रकारची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. या विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून मागील ११ महिन्यांत ८ कारवाया करून १० जणांना बेड्या ठोकल्या.
लाचखोरीची कीड संपणार कधी? लाचखोर अधिकाऱ्यांविरोधातील कारवाईचा आकडा दरवर्षी वाढत आहे. या वर्षात एकूण ८ कारवायांमध्ये १० कर्मचारी लाच घेताना पकडले गेले आहेत.
लाचखोरीबाबत तक्रार कुठे करणार ? अधिकारी व कर्मचारी आर्थिक हव्यासापोटी पैशांची मागणी करतात. अशांवर अंकुश लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. कुणी काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्यास विभागाच्या कार्यालयात जाऊन किंवा टोलफ्री क्रमांकावर कॉल करता येतो. काही शासकीय विभागात तर लाखांपेक्षा अधिक पगार आहे. तरीही लाच घेण्याची हाव सुटत नसल्याचे चित्र लाचलुचपत विभागाच्या कारवायांवरून स्पष्ट होते.
महसूल विभागात सर्वाधिक लाचखोर ! येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या ११ महिन्यांत केलेल्या कारवाईत सर्वाधिक महसूल तसेच भूमी अभिलेख विभागातील तब्बल ८ लाचखोर जाळ्यात अडकले आहेत.
लाचेचा मोह अधिक 'अधिकारी व कर्मचाऱ्यांना'मागील ११ महिन्यांत जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत बहुतांश क्लास टू व श्री चे अधिकारी सापडले आहेत. यावरून त्यांना लाच घेण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे. हा मोह सर्वच शासकीय विभागातील अधिकाऱ्यांमध्ये दिसतो.
११ महिन्यांत ८ कारवाया; १० लाचखोर जाळ्यातविभाग पद आरोपी पंचायत विभाग विस्तार अधिकारी १भूमी अभिलेख शिरस्तेदार २महसूल विभाग महसूल सहायक १महसूल विभाग तलाठी १महसूल विभाग तलाठी १महसूल विभाग तलाठी १पोलिस विभाग पोलिस हवालदार १ भूमी अभिलेख छानणी लिपीक २
"कोणत्याही कामासाठी शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांना लाच देणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कुणीही बेकायदेशीररीत्या पैशांची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिव्हिल लाइन्स, नागपूर रोड भंडारा येथे तक्रार करावी. तसेच ९८७०३७६७०६, ९८२३२४०१२९ वर संपर्क करावा."- डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग