भंडारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षकांची ९९ पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा मुद्दा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी लावून धरला. त्यानंतर विज्ञान विषयासह पदवीधर सहायक शिक्षकांना आता पदवीधर शिक्षक म्हणून सामावून घेण्यात येईल, असा ठराव शुक्रवारला झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला.विज्ञान शिक्षकांची रिक्त पदे, चौथीच्या शाळेला पाचवीचा व सातवीच्या शाळेला आठवीचा वर्ग जोडण्याचा मुद्दा, गणवेशचा पुरक पैसा, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, रोस्टर अद्ययावत नसल्याने रखडलेली आंतरजिल्हा भरतीप्रक्रिया यासह डावी-कडवी योजनेची बांधकाम आदी मुद्दे या सभेत चर्चेला आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापदी राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शिक्षणाधिकारी (प्राथ) सुवर्णलता घोडेस्वार, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, धनंजय तुरकर, राणी ढेंगे, प्रेरणा तुरकर, वर्षा रामटेके, संगिता मुंगुसमारे, मनोहर कहालकर, अशोक कापगते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे उपस्थित होते.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांची ९९ पदे रिक्त आहेत. यामुळे शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी होत असतानाही ही रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा मुबारक सय्यद यांनी समितीमध्ये उपस्थित केला. यावेळी जिल्हा परिषदच्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीला शिकविणारे विज्ञान विषयासह पदवीप्राप्त केलेले सहायक शिक्षक आहेत. त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून त्याच वेतनश्रेणीवर नियुक्त करण्यात येईल. हे शिक्षक इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवितील. मात्र, ही नियुक्ती शासनाच्या आदेशाच्या अधिन राहून करण्यात येणार असल्याचा ठराव समितीच्या सभेत पारित करण्यात आला. त्यानंतर सहायक शिक्षकांच्या रिक्त पदांवर नविन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. यासोबतच शिक्षकांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक तात्काळ मिळावे, गणवेशाचे लाभार्थी वाढल्याने पैसा कमी पुरवठा करण्यात आला. त्यासाठी पूरक पैसा मिळावा व मागीलवर्षीचा गणवेशाचा शिल्लक पैसाही देण्यात यावा, अशी मागणी या समितीत करण्यात आली. यावर समितीत विषय चर्चेला आणून या प्रलंबित बाबींची पुर्तता तातडीने करण्याचा ठराव घेण्यात आला. निवड श्रेणीचा निपटारा व शिक्षकांना कायमस्वरूपी करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी मुबारक सय्यद व रमेश सिंगनजुडे यांनी केली. या दोन्ही बाबींचे निराकरण करण्याचा ठराव घेण्यात आला. जिल्ह्यात रिक्त असलेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची ३५ पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया व आंतरजिल्हा बदलीचे रोस्टर अद्ययावत करून त्याला आयुक्तांकडून मान्यता मिळताच जात व संवर्गनिहाय पद भरती करणे, अंशदायी पेन्शन योजनेचा निधी देण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल, असा निर्णयही या समितीत घेण्यात आला. (शहर प्रतिनिधी)तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी वाढविल्या अडचणीचौथा वर्ग असेल तिथे पाचवी तर सातवीच्या ठिकाणी आठवी जोडण्याचे आदेश आहे. यात तत्कालीन शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे यांनी चौथी व सातवीच्या शाळांकडून तसे प्रस्ताव मागितले. एक किमीवर पाचवी तर तीन किमीवर आठवीची शाळा उघडू नये, असा नियम असतानाही शेंडे यांनी डांबेविरली येथील खासगी शाळेला पाठिशी घालताना जिल्हा परिषद शाळेला आठव्या वर्गाची मान्यता दिली. सोबतच विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर वर्ग बंद करण्याचे आदेश दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. दरम्यान ग्रामस्थांनी खासगी शाळेत भौतिक सुविधा नसल्याचा आरोप केला होता. यावेळी सदर संस्थाचालकांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायप्रविष्ठ प्रकरणानंतर आयुक्त व शिक्षण उपसंचालकांनी पत्र पाठवून न्यायालयाचा अवमान होऊ नये, म्हणून यावर्षी जिल्हा परिषद शाळेने आठवा वर्ग सुरू करू नये व खासगी शाळेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात की, नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव सभेत मान्य करण्यात आला.
९९ सहायक शिक्षक बनणार पदवीधर शिक्षक
By admin | Updated: August 6, 2016 00:23 IST