देवरी : अनुसूचित जमातीत धनगर जातीच्या लोकांना समाविष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. राज्यात एक कोटी १० लाख आदिवासींची संख्या आहे. देवरी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आपले अधिकार व अस्तित्व वाचविण्यासाठी धनगर जातीचा समावेश आदिवासी जमातीत करून आदिवासी समाजाच्या आरक्षणावर केले जात असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. देवरी तालुक्यातील आदिवासी बांधव शेकडोंच्या संख्येत या मोर्च्यात सहभागी झाले होते. सदर मोर्चा देवरीच्या प्रमुख मार्गांनी भ्रमण करीत उपविभागीय कार्यालयात पोहचला. तेथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेत देवरीचे उपविभागी अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार आर.डी. यामावार व आर.के. शेंडे पोहचले. तेथे त्यांनी आदिवासी समाजाचे निवेदन स्वीकारले. आॅल इंडिया आदिवासी पिपल्स फेडरेशन, आॅल इंडिया आदिवासी एम्लाईज फेडरेशन, आॅल इंडिया इंजिनिअर्स स्टुडंट फेडरेशन, आदिवासी हलबा हलबी समाज संघटन, आदिवासी कवर समाज संघटन, बिरसा मुंडा ब्रिगेड, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आॅफ इंडिजी नस पिपल्स, आदिवासी बचाव कृती समिती, आदिवासी पालक महासंघ व आदिवासी महिला युती यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. सदर मोर्चाला आ. रामरतन राऊत यांच्यासह, जिल्हा भाजप आदिवासी युतीचे अध्यक्ष संजय पुराम, भरतसिंह दूधनाग, इंदल अरकरा, लोकनाथ तितराम, मधुकर कुरसुंगे, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे चेतन उईके यांनी मार्गदर्शन केले. संचालन आदिवासी विद्यार्थी संघाचे मधू दिहारी यांनी केले. या मोर्चात पिवळे शेले घालून खांद्यावर परिधान करून आणि विविध फलके घेवून सहभागी झालेले नागरिक लक्ष वेधून घेत होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (शहर प्रतिनिधी)
आदिवासी समाजाचा एसडीएम कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: September 1, 2014 23:21 IST