भंडारा : तहसील कार्यालय पवनी येथे मागील अनेक दिवसांपासून श्रावणबाळ विधवा महिला, अपंग व निराधारांचे प्रकरणे प्रलंबित आहेत. तर अनेकांना मिळणारे मानधन वेळेत मिळत नाहीत. यासाठी आंबेडकरवासी संघर्ष पार्टीच्या नेतृत्वात शेकडो निराधार महिलांनी पवनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. येथील कर्मचाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात निराधार महिलांना देण्यात येणाऱ्या मानधनाचाही समावेश आहे. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र त्यातही अनेकांना या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्यवहारामुळे लाभार्थ्यांना मानसीक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. येथून श्रावणबाळ, विधवा महिला योजना, अपंग व निराधार लाभार्थ्यांना त्यांचे जीवन जगता यावे याकरीता त्यांना महिन्याच्या सुरूवातीला मानधन देण्यात येते. मात्र काही महिन्यांपासून त्यांना सुरळीत मानधन मिळत नाही.यासोबतच दुष्काळग्रस्तांना देण्यात येणारे पैसेही वेळेवर मिळाले नाही. राशनकार्ड मिळविण्यासाठी अनेकांना तहसील कार्यालयात येरझरा घालाव्या लागत आहे. यासह अनेक प्रलंबित मागण्यांना घेवून आंबेडकरवाडी संघर्ष पार्टीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला. यानंतर तहसीलदार पैठनकर यांना एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कामे तातडीने केल्या जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.शिष्टमंडळात नंदागवळी यांच्यासह हरीष ठवरे, उदाराम पाटील, पंढरी बडगे, सुनिल मेश्राम, गीरेश्वर चवरे, देविदास वैद्य, मंगला देशमुख, तारा लाडे, हरीभाऊ धारगावे, लीला कावळे, नागसेन ढवळे, यशोदा धकाते, मोहम्मद ईसराईल, कुरेशा बेगम, तुर्जा मसराम आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
निराधारांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: August 30, 2014 01:36 IST