भंडारा : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाने जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी या सात तालुक्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे जवळपास पाच हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्ह्यात भंडारा, तुमसर व साकोली उपविभागीय कार्यालये आहेत. या कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी आहेत. त्यामुळे सेतू केंद्राच्या माध्यमातून तयार होत असलेले जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, डोमिसीएल, उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, हलपनामे तयार करण्यात येत आहे. सध्या शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व दाखले मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व अन्य शैक्षणिक कामाकरीता तथा नौकरीच्या संदर्भात या दाखल्यांची व प्रमाणपत्रांची नितांत गरज असते. हे प्रमाणपत्र किंवा दाखले तयार करून उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील लिपीकांकडे हे सादर केले जाते. सदर लिपिकांकडून दाखले व प्रमाणपत्रांसाठी जोडलेले कागदपत्रांची पुर्तता झाल्याची शहानिशा केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी होते व त्यानंतर ती फाईल नायब तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येते. नायब तहसीलदारांच्या संतुष्टी व त्यांच्या स्वाक्षरीनंतर अंतिम स्वाक्षरी व दाखला किंवा प्रमाणपत्र देण्याच्या हिशोबाने ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येते. मात्र तहसील व उपविभागीय कार्यालयातून लिपीक संपात असल्याने सदर दाखले व प्रमाणपत्र अजूनही सेतू केंद्रात धुळखात पडले आहेत. भंडारा सेतू केंद्रात दररोज १०० केसेस बनविण्यात येत आहे. आज मितीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्वाक्षरी करीता थांबलेले सुमारे ६०० व नायब तहसीलदारांकडून उत्पन्नाच्या दाखल्याकरीता थांबलेले ७०० प्रकरणे या संपामुळे प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा विचार केल्यास सुमारे पाच हजारावर दाखले व प्रमाणपत्रांची कामे रखडली असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड मनस्तापाचे वातावरण दिसून येत आहे.पाचव्या दिवशी राज्यभरातील तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनाही या संपात सहभागी झाल्याने भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व साकोली येथील उपविभागीय अधिकारी वगळता सातही तहसीलदार व नायब तहसीलदार कार्यालयात न बसता त्यांनी संपात सहभाग दर्शविला आहे. सहावा दिवस होवूनही राज्य शासनाने या संपाबाबत महसूल कर्मचाऱ्यांची भूमिका समजावून न घेतल्याने संप पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहे. सहा दिवसापासून महसूल विभागाचे कार्यालयात कुठलाही कर्मचारी कार्यरत नसल्याने तिथे शुकशुकाट दिसून येत आहे. ऐरवी गजबजून राहणारी ही कार्यालये आता पूर्णत: ओस पडल्यागत दिसत आहे. भंडारा तहसील कार्यालयात फेरफेटका मारला असता इथे प्रशिक्षणार्थी महिला नायब तहसीलदार आभा बोरकर या त्यांच्या कार्यालयात कर्तव्यावर उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांच्यासोबत नव्यानेच तहसील कार्यालयात रूजू झालेले तीन कर्मचारी कार्यालयात नायब तहसीलदार बोरकर यांच्या दिमतीला आहेत. मात्र तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपीक तथा मुख्य कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नायब तहसीलदार बोरकर या दिवसभर कार्यालयात बसून काही प्रमाणात कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असला तरी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांचे कार्य सध्या तोकडे पडत आहे. उपविभागीय अधिकारी यांच्यासह कार्यालयात ९ कर्मचारी आहेत. मात्र यातील उपविभागीय अधिकारी, चालक व स्टेनो वगळता उर्वरित सहा कर्मचारी संपात सहभागी झाल्याने उपविभागीय कार्यालयातही फाईलींचा खच पडला आहे. उपविभागीय व तहसील कार्यालयातील वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने या परिसरात बोट्यावर मोजण्याइतके कर्मचारी कार्यालयात हजर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कामाकरीता येणारे नागरिकांची संख्याही रोडावली आहे. (शहर प्रतिनिधी)
संपामुळे पाच हजारांवर प्रकरणे प्रलंबित
By admin | Updated: August 6, 2014 23:40 IST