तुमसर : पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सध्या शेतकरी बांधावर असून डोळे आकाशाकडे लागून आहेत. तुमसर तालुक्यात २९ हजार ३०० हेक्टर शेतात भात शेती केली जाते. सध्या शेतकऱ्यांनी १० टक्के शेतीत धानाचे पऱ्हे घातले आहेत. उर्वरीत ९० ट्कके शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.तुमसर तालुक्यात बावनथडी, सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प, चांदपूर तलावामुळे शेतीला सिंचनाचा लाभ होतो. ८ हजार २०० हेक्टर शेती प्रत्यक्ष सिंचनाखाली येते. शेततळी (कृषी विभाग) २०८ आहेत. तर खासगी विहिरी २७० इतक्या अल्प आहेत. सरासरी धान पिकांचा हंगाम चार महिन्याचा इतका असतो. धान पेरणी रोवणी उशिरा केली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. तुमसर तालुक्यात धानाची रोवणी २५०० हेक्टरमध्ये करण्यात आली आहे.मागील हंगामात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ९० टक्के धान रोवणी आटोपली होती. मार्च २०१४ मध्ये बावनथडी प्रकल्पगात २०५ दलघनमीटर पाणी होते. या प्रकल्पाची क्षमता २५४ दलमिटर आहे. सध्या केवळ १३० दलघनमिटर पाणीसाठा आहे. त्यामुळे सिंचनाकरिता पुढे पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे. दोन मध्यम प्रकल्प सोंड्या टोला उपसा सिंचन व चांदपूर तलावाच्या पाण्याने ८४०० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात यावर्षी ३८.६ मि.मी. पावसाची नोंद आहे. तर सन २०१३ मध्ये २८ जून पर्यंत १९५.८ मि.मी. पाऊस पडला होता. बावनथडी प्रकल्पात सन २०१३ मध्ये पाणी साठवणूक करणे सुरु झाले होते. प्रकल्पाच्या वितरीकेची कामे रखडली आहेत. मुख्य कालवा व त्याच्या जवळील लहान वितरीकेतून सिंचनाकरिता पाणी देण्यात येते. परंतु दूरवरील गावातील वितरीकेची कामेच झाली नाहीत. यात तुमसर शहर, मांगली, देव्हाडी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, उमरवाडा, बोरी, बाम्हणी गावांना प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. सोंड्या टोला उपसा सिंचन योजनाच आॅक्सीजनवर आहे. ११० कोटीची योजना केवळ १२ लाखांच्या निधीकरिता शेवटची घटका मोजत आहे. येथे नियोजनाचा अभाव दिसत असून हेतुपुरस्सर योजनाच भंगारात काढण्यात येत असल्याचे दिसून येते. जबाबदारी एकमेकांवर टाकण्यात येथे अधिकारी समोर दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शेतकरी बांधावर... नजरा मात्र आकाशावर
By admin | Updated: July 9, 2014 23:17 IST