जागतिक चिमणी दिन : नैसर्गिक अधिवास व त्यांचे अन्न संरक्षित ठेवण्याचा संदेशगिरीधर चारमोडे मासळएक होती चिऊ, एक होता काऊकावळ्याचे घर होते शेणाचे, चिमणीचे घर होते मेणाचेएक दिवशी काय झाले, मोठा पाऊस आला आणि....आणि काय? तर लहानपणी बऱ्याच जणांनी ही आजी, आईकडून एकलेले असणार. एक घास चिऊचा..’ असं सांगत आई बाळाला भरवायची आणि चिऊच्या प्रेमापोटी आपण, बाळ सुद्धा, एक घास का असेना आईच्या हाताने खाण्याचे आनंद अनुभवलो. पण आता हीच चिऊ चिऊताई कुठे गेली असेल? तो चिवचिवाट, तो आनंद, तो नैसर्गिकपणा सारे काही पडद्याआड झालंय. चिमण्यांचे अध:पतन झाले. त्यांच्यावर संक्रांत आली. चिमणी निसर्गातून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. असे का बरं झालं असेल? यावर चिंतन करण्याची वेळ आज बुद्धीवान प्राणी माणसांवर आलेली आहे.चिमणी हा अत्यंत संवेदनशील पक्षी आहे. मानवाला निरुपद्रवी व मानवाच्या सहवासात व घरात सातत्याने वावरणारा छोटासा पक्षी आहे. पर्यावरणातील बदलाबाबत चिमण्या खूप संवेदनशील असतात. चिमण्यांच्या संख्येत झालेली घट पर्यावरणाचा समतोल ढासळल्याची खात्री पटवून देतो. एक काळ असा होता की जेव्हा चिमण्यांचा चिवचिवाट सतत कानी पडायचा. अंगणात दाणे टिपायला आलेल्या चिमण्यांची बाळाला जेवण भरविण्यासाठी मदत व्हायची. एक घास चिऊचा, एक घास काऊचा, असे म्हणत चिमण्या दाखवित आई बाळाला घास भरवायची. भिंतीवर टांगलेल्या फोटो फ्रेममागे चिमण्या घरटी बांधायच्या. दिवसभर गवताच्या काड्या, धागे, पिसे, कापूस आणून घरात व अवतीभवती खेळायच्या व घरटी बांधायच्या. चिमण्यांच्या चिवचिवाटाची जणू प्रत्येक व्यक्तीला सवय झाली होती.मानवाजवळ सतत वावरणारी, जमिनीवर, अंगणात पडलेले धान्य, बी, दाणे टिपून खाणारी, एवढंच नाही तर स्वयंपाक घरात थेट प्रवेश करून जेवण करणारी चिऊताई, पर्यावरणपूरक कामही करते. गायी, म्हशीच्या शेणामध्ये असलेले न पचलेले दाणे त्या खातात. तसेच पिकांचा नाश करणाऱ्या असंख्य कृषी, कीटक, अळ्या खाऊन शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे चिऊताईच आहे. मानवाच्या सानिध्यात राहून जीवन जगणारी चिमणी शहरापाठोपाठ खेड्यातूनही हद्दपार झाली आहे.काळ बदलला तसे गाव, शहरे सुद्धा बदलली आहेत. जुनी लाकडाची घरे, वाडे, जनावरांचे गोठे नष्ट झाले आहेत. चकचकीत बंगले, गगनचुंबी इमारती, उभ्या राहियाने जुन्या पद्धतीच्या घरांबरोबरच चिमण्यांचे घर सुद्धा वाहून गेले आहे.चिमण्या या पर्यावरणातील बदलाबाबद खूपच संवेदनशिल असल्याने हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण त्यांच्यासाठी जीवघेणे ठरत आहे. कारखान्यातील निघणारा विषारी धूर, कर्णकर्कश आवाज, वाहनांचे हॉर्न, भोंगे यांनी तर अतीशय धोक्याची पातळी गाठली आहे. वृक्षतोडीमुळे चिमण्यांना घरटे बनण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही.वाढते प्रदूषण, संपुष्टीत नैसर्गिक अधिवास, सिमेंट, डांबरी रस्ते, दळणवळणाची अत्याधुनिक साधने, मोबाईल टॉवर्स व त्यातून उत्सर्जीत होणारे अपायकारक किरणे यांचा प्रत्यक्ष परिणाम चिमण्यांवर होऊन चिमण्या नष्ट होत आहेत. मानवाचा निसर्गात वाढत चाललेला हस्तक्षेप चिमण्यांच्या अध:पतनासाठी कारणीभूत ठरलेला आहे. शहरातील पालापाचोळा, झाडांची कमतरता यामुळे चिमणीला घरटी बांधायला कच्चा माल मिळत नाही. शिवाय घातलेली अंडी, लहान पिल्ले यांना मांजर, कावळा व तत्सम भक्षकानी आपले शिकारी बनविल्याने सुद्धा चिमण्यांच्या संख्यत लक्षणीय घट झालेली आहे. सध्या गेल्या १० ते १५ वर्षापासून चिमण्यांची संख्या घटून २४ ते ३० टक्केवर येऊन ठेपली आहे. डबक्यातील पाणी डांबरीकरणाचे व सिमेंटचे रस्ते यामुळे तर चिमण्यांना आंघोळ करणेही दुरापास्त झाले आहे. एकुणच काच तर बदललेली मानवी जीवनशैली चिमण्यांकरिता कर्दनकाळ ठरत आहे.सन २०१० पासून चिमणी दिन जगात साजरा होत आहे. हा दिवस उत्सव नसून त्यांचा अधिवास संरक्षित करण्याचा व चिमण्यांना सुरक्षा पोहचविण्याचा दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे.चिमण्यांना फळ देणारी जास्त आकर्षित करतात म्हणून आपण फळ देणारी झाडे उदा. डाळींब, पेरू, आंबा, चिक्कू यांची परसबागेत झाडे लावायला पाहिजेत. सिमेंटचे जंगल कमी करून, पर्यावरणपूरक घरे बनवायला हवीत. सेंद्रीय शेती करण्याचे प्रमाण वाढवून, कीटकनाशके व तत्सम बाबी टाळायला पाहिजेत. शहरांबरोबरच खेड्यात सुद्धा चिमण्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. चिमण्याचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित कसा राहील याचा विचार शासनस्तरावर होणे आवश्यक आहे. निसर्गप्रेमी, पक्षीसंरक्षक यांनी अभ्यासपूर्ण माहिती गोळा करून जनजागृतीसोबत शासनाच्या हस्तक्षेपाची गरज शोधली पाहिजे. शाळा महाविद्यालयात निबंध, चित्रकला, कवितावाचन या सारख्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करायला हवी. त्याचप्रमाणे पसरट भांड्यात पाणी व धान्ये आपल्या घराच्या बालकनीत ठेवून आपण आलेल्या चिमण्यांची आंघोळीसाठी व जेवणासाठी सोय केली पाहिजे. घराच्या अवती भवती बारमाही सावली देणारे व फळ देणारी झाडे आग्रहपूर्वक लावायला हवीत. चिमणी राहील तर पर्यावरण संतुलन राहील. म्हणून चिमण्यांचा अधिवास व क्षेत्र आपण वाचवून निसर्गाला हातभार लावू शकतो. या दिनानिमित्त चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास व त्यांचे अन्न संरक्षित ठेवण्याचा संदेश घराघरात पोहचणे आवश्यक आहे. चिमण्यांचे दु:ख मानव नाही तर कोण जाणणार?
चिमण्यांचे दु:ख संपणार तरी कधी?
By admin | Updated: March 20, 2017 00:20 IST