मतदानात नोटाचा वापर : पोस्टल बॅलेटमध्ये २०२ जणांचे मतदान ठरले अवैध
भंडारा : निवडणूक कामात सहभागी झालेल्या कर्मचार्यांना निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. हे सर्वच कर्मचारी अर्थात सुशिक्षित आहेत. ते आपल्या पदावर म्हणूनच जबाबदारीने कामही करतात. मात्र पोस्टल बॅलेटने प्राप्त झालेल्या मतांपैकी तब्बल २०२ कर्मचार्यांची मते अवैध ठरली आहे. ९०३ कर्मचार्यांनी मात्र बरोबर मतदान केले आहे. तब्बल २०२ कर्मचार्यांची मते अवैध ठरल्याने आता त्यांच्या सुशिक्षितपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत मतदारांना ‘नोटा’चा (यापैकी एकही उमेदवार लायक नाही) पर्याय उपलब्ध करून दिला होता. निवडणुकीच्या रिंगणातील एकही उमेदवार मतदाराला लायक वाटत नसल्यास, त्याने ‘नोटा’चे बटन दाबून मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली होती. ुनवडणूक आयोगाच्या या संधीचा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील ४,०३२ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर करून उमेदवारांना चपराक लगावली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील तुमसर विधानसभा मतदार क्षेत्रात ७२४, भंडारा क्षेत्रात ८२८, साकोली क्षेत्रात ५६२, अर्जुुनी क्षेत्रात ५२१, तिरोडा क्षेत्रात ५३७ तर गोंदिया क्षेत्रात ८५८ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले. तब्बल ४,०३२ मतदारांनी लोकसभा निवडणूक रिंगणातील २६ उमेदवारांपैकी एकही उमेदवार लायक नसल्याचे त्यातून दर्शवून दिले. मात्र लाखो मतदारांनी रिंगणातील उमेदवारांच्या पारड्यात मते टाकून ही बाब झिडकारली आहे. कर्मचारी सरकारवर नाराज राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना कर्मचारी मात्र त्यावर नाराज होते, असे स्पष्ट होत आहे. पोस्टल बॅलेटमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार नाना पटोले यांनी तब्बल ४४३ मते प्राप्त केली. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रफुल पटेल यांना ४२५ मते मिळाली. सातवा वेतन आयोग नेमूनही शासकीय कर्मचारी केंद्र व राज्य सरकारवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोंदियानेही दिला दगा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रफुल पटेल यांना खुद्द त्यांचे गृह क्षेत्र असलेल्या गोंदिया विधानसभा मतदार संघानेही दगा दिला. या विधानसभा क्षेत्रात भाजप महायुतीचे नाना पटोले यांनी त्यांच्यावर ५,१०७ मतांची आघाडी घेतली. पटोले यांना ८३ हजार ५३४ तर प्रफुल पटेल यांना ७८ हजार ४२७ मते मिळाली. (जिल्हा प्रतिनिधी)