भंडारा : राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. कर्मचारी संपावर असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र तथा उत्पन्नाचे दाखले, महसूल कार्यालयात धुळखात पडले आहेत.१ आॅगस्ट पासून राज्यभरातील महसूली कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील वर्ग ३ चे २५० व वर्ग ४ चे ५२ कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील तहसील कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या दाखल्यांचे काम रखडले आहे. या कर्मचाऱ्यांसोबत आता तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनाही बंदात सहभागी झाल्याने सदर दाखल्यांवर स्वाक्षऱ्या करणारे अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे खोळंबली आहेत. या संपामुळे विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखले, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र अशा महत्वाच्या प्रमाणपत्रांवर स्वाक्षऱ्या होत नसल्याने सदर प्रमाणपत्र विद्यार्थी वेळेत महाविद्यालयीन किंवा नोकरीच्या ठिकाणी देण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांचा या संपाचा त्यांना मोठा फटका बसत आहे. सेतू केंद्राच्या माध्यमातून सदर प्रमाणपत्र बनविल्या जात आहेत. मात्र सक्षम अधिकारी संपात सहभागी झाल्याने ही दाखले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वेळेत मिळू शकत नाही. हे दाखले अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसाठी थांबलेली असल्याने जिल्ह्यातील सातही तालुक्यात हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याने या प्रमाणपत्रांची गठ्ठेच्या गठ्ठे स्वाक्षऱ्यांसाठी थांबले आहेत. यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. (शहर प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका
By admin | Updated: August 5, 2014 23:20 IST