भंडारा : नफ्याची शेती करण्याकरिता शेतकऱ्यांनी काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञानाची जोड स्विकारून यांत्रिक शेती करून खर्च कमी करावा. यामुळे उत्पन्नात वाढ होवून शेती नफ्याची होण्याकरीता मदत होईल, असे मार्गदर्शन पालांदूर येथे यांत्रिक डवरणाचे प्रात्याक्षिक प्रसंगी मुखरू बागडे यांच्या शेतावर डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र साकोलीच्या प्रमुख उषा डोंगरवार यांनी शेतकऱ्यांना केले.यावेळी पालांदूर मंडळ कृषि अधिकारी अरुण रामटेके, कृषि सहायक भुते, सपाटे, शिवणकर, गिऱ्हेपुंजे, खुनारीचे सरपंच हेमंत सेलोकर, आत्माचे सदस्य मधू कोरे, प्रगतशेतकरी काशिनाथ निखाडे, मोरेश्वर खंडाईत, रमेश पराते, दलीराम राघोर्ते, भगवान शेंडे, श्रावण सपाटे, महेंद्र कठाणे, गोकूल राऊत, दिलीप राऊत, उमेश हटवार, क्रिष्णा पराते आदी शेकडोच्यावर शेतकरी प्रत्यक्ष बांधावर उपस्थितीत होते.पुढे त्या म्हणाल्या, यांत्रिक डवरणामुळे मनुष्यबळ कमी लागतो. या यंत्राने एका दिवसात तीन एकर शेतीचे डवरण होवू शकते. एका एकराला सरासरी एक लिटर पेट्रोल लागतो. धानाला डवरा देतेवेळी धान विशिष्ट अंतराने एका रेषेत लागवड केली असावी. पंधरा विस दिवसाच्या रोवण्यात डवरण केल्यास धानाला फुटवे अधिक येतात. डवरणाकरिता तीन चार इंच पाणी बांधित असावा. चिखल मऊ असावा आदी घटक यांत्रिक डवऱ्याकरीता आवश्यक आहेत. डवरणामुळे तणाचा नास होवून धानाच्या मुळांना प्रगती करायला मदत होते. हे यंत्र तामिळनाडू येथून ४४५०० असे किमतीचे आहे. पुढे हे यंत्र एमएआयडीसी अंतर्गत अनुदानावर उपलब्ध होवू शकते. कार्यक्रमाकरिता पालांदूर येथील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
नवीन तंत्रज्ञानाने शेती विकसित करा
By admin | Updated: August 6, 2014 23:41 IST