पवनारखारी आश्रमशाळेतील घटना : मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीसतुमसर : तुमसर तालुक्यातील पवनारखारी येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा डेंग्यू या आजाराने सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहित मनोहर सलामे (१३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. इंदिराबाई मरस्कोल्हे आश्रमशाळा पवनारखारी येथे आठव्या वर्गात शिकत होता. पवनारखारी हे आदिवासी बहुल गाव आहे. एका महिन्यापुर्वी या गावात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळले होते. या गावाशेजारी इंदिराबाई मरस्कोल्हे अनुदानित निवासी आश्रमशाळा आहे. येथील विद्यार्थी रोहित सलामे याला डेंग्यू हा आजार झाला. प्रथम त्याच्यावर तुमसर येथील एका खाजगी रुग्णालयात चार दिवस उपचार करण्यात आले. प्रकृती खालावल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९.३० वाजता त्याचा मृत्यु झाला. याच शाळेत कामाठी पदावर कार्यरत मनोहर सलामे यांचा रोहित हा मुलगा होता. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकाने प्रकल्प अधिकारी व शाळा संचालकांना माहिती दिली नव्हती. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाईची मागणी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी यांना केली आहे. त्यानंतर प्रकल्प अधिकारी मडावी यांनी शाळा संचालकांना माहिती देऊन संबंधित मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले. सध्यास्थितीत तुमसर तालुक्यात डेंग्यु सदृश्य आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या गावाला जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी २० दिवसापूर्वी भेटी दिल्या होत्या. परंतु उपाययोजना करण्यात आलेली नाही.पिंडकेपार येथे आजाराची लागणभंडारा : पिंडकेपार या गावात विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे. नाल्या सफाईअभावी सांडपाणी साचून राहते व यातून डासांची उत्पत्ती होत आहे. सुरज बाळकृष्ण दिवटे हा १४ वर्षीय बालक डेंग्यू आजाराने ग्रस्त असल्याने त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. पालांदूर परिसरात डेंग्यूपालांदूर : परिसरात विषाणूजन्य आजाराचे थैमान सुरूच आहे. ही साथ पेलविण्याची क्षमता प्रशासनात उरली नसल्याने बऱ्याच व्यक्तींना जीव गमवावा लागत आहे. काल मऱ्हेगाव येथील समिक्षा सुरेश राऊत (११) ही पाचव्या वर्गात शिकणारी विद्यार्थीने तापाच्या लागणमुळे जीव गमावला आहे. निमगाव येथील प्रियंका संजय तिवाडे (२०) हिला डेंग्यू असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डेंंग्यूने विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: September 2, 2014 23:29 IST