सासरा : साकोली तालुक्यातील सासरा व परिसरातील गावांमध्ये डेंग्यु तापाच्या रुग्णात वाढ होत आहे. यापूर्वी येथील एकाच कुटूंबात सोनु शंकर लोथे, कमलेश शालिक लोथे, जावेद घनश्याम लोथे ही चार बालके संशयीत डेंग्युचे असल्याचे आढळून आले. दिवसेंदिवस डेंग्युच्या रुग्णात वाढ होत असल्याने गावात खळबळ उडाली आहे. डेंग्युच्या रूग्णांमध्ये भर पडून सुमेध देवानंद बोरकर, आर्थन बबन बोरकर, छकुली बबन बोरकर, मॅथिली पृथ्वीराज वासनिक, रियाज पृथ्वीराज वासनिक, टोनी महादेव गोटेफोडे, निशा महादेव, गोटेफोडे, दिपांशु उमेश गायधने ही सात बालके अशी एकूण अकरा बालके संशयीत डेंग्युचे रुग्ण असल्याचे वैद्यकीय तपासणी करून दिसून आले आहे. हे सर्व बालके ६ ते १५ वयोगटातील असून सासरा येथील रहिवासी आहेत. साकोली तालुक्यातील सासरा गावाव्यतिरिक्त विहिरगाव, सानगडी, कटंगधरा या परिसरातील गावांमध्येही आढळून आल्याचे बोलले जात आहे. सासरा येथील सरपंच योगराज गोटेफोडे यांनी भंडारा येथील हिवताप निर्मूलन केंद्र, पंचायत समिती साकोली येथील खंडविकास अधिकारी, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. वैद्यकीय चमूने गावाला भेट दिली पण अद्यापही धूर फवारणीसाठी कोणतीही ठोस पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. परिणामी दिवसेंदिवस डेंग्युच्या रुग्णात वाढ होत आहे. विहीरगाव, सानगडी, कटंगधरा, न्याहारवानी, सानगाव, शिवनीबांध आदी गावातील नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णात वाढ होवू नये यासाठी सासरा येथील आको मेश्राम, जयपाल बोरकर, उमेश गायधने, हिवराज भोवते, उत्तमराव गायधने आदी जागरूक नागरिकांनी गावात व परिसरात शक्य तितक्या लवकर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
सासरा येथे डेंग्युची लागण
By admin | Updated: May 22, 2014 23:37 IST