भंडारा : गुटखा व पान मसाल्याला तरुणाईसह सर्वच वयोगटातील लोकांकडून मोठी मागणी असली तरी मात्र तरुण व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य शासनाने गुटखाबंदीचा निर्णय घेतला. तरीही पानटपरीवर गुटख्याची विक्री जोमात होत आहे. गुटखाबंदीची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. या बंदीसंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सुचना न आल्याने कारवाईबाबत अधिकाऱ्यात संभ्रमाचे वातावरण आहे. गुटखाबंदीचे व अंमलबजावणीचे अधिकार अन्न व औषध प्रशासनास दिले आहेत. बंदीचा निर्णय होऊन कित्येक महिले लोटले आहे. अद्याप अंमलबजावणी झाली नाही. गुटख्याच्या आहारी गेलेल्यांनी बंदी लक्षात घेऊन एकदाच पुढील तीन चार महिने पुरेल इतका साठा विकत घेऊन ठेवल्याचे किरकोळ विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. बंदीनंतर सुरुवातीला गुटखा विकावा का म्हणून विक्रेतेही संभ्रमात आहेत. शाळा महाविद्यालयाचा आवार तसेच बसस्थानक, शासकीय कार्यालयाच्या परिसरात गुटखा विक्री बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाने करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. या आशयाची कारवाई अन्न व औषधी प्रशासनाकरवी करणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात झालेली नाही.मध्यंतरी अशाच पद्धतीने गुटख्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न २००२ मध्ये झाला होता. त्यावेळी कंपन्यांनी गुटखा ऐवजी पान मसाला व त्यामध्ये तंबाखू मिसळण्याची दुसरी एक पुडी तयार केली होती. या दोन पुड्या एकत्र केले की गुटखा तयार होत असल्याने त्यावेळच्या बंदीतून असा मार्ग काढला होता. या वेळेस कंपन्या कोणती नवी कल्पना लढवणार याकडे तंबाखू शौकीनांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
गुटखाबंदीची अंमलबजावणी सक्तीने करण्याची मागणी
By admin | Updated: September 18, 2014 23:31 IST