मोखे शेतशिवारातील घटना : साकोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखलसाकोली : रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारा अचानक कसल्यामुळे एका शेतकऱ्याचा गळा चिरला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. माधोराव नत्थू तरोणे (५०) रा.मोखे असे मृताचे नाव असून ही घटना आज दुपारच्या सुमारास मोखे शिवारात घडली. तरोणे हे पत्नीसोबत शेतात रोवणीसाठी गेले होते. शिवाराला लागून असलेल्या रस्त्यावर पावसामुळे विजेचे खांब पडले होते. परिणामी विजेच्या ताराही रस्त्यावर पडल्या होत्या. मात्र विद्युत पुरवठा बंद होता. या तारा मात्र शेतशिवारातून गेल्या होत्या. नेमका याचवेळी रस्त्यावरून एक चारचाकी वाहन गेले. त्या वाहनावर रस्त्यावर पडलेला तार लटकला गेल्याने तो कसण्यात आला. याचवेळी शेतशिवारात ताराजवळ काम करीत असलेल्या तरोणे यांचा गळा तारांमध्ये सापडला. यात त्यांचा गळा चिरला गेला. तरोणे हे कोसळल्याचे बघता त्यांना मोखे येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून शवविच्छेदन उद्या दि.२४ रोजी होणार आहे. तपास पोलीस निरीक्षक खारतोडे करीत आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली असा आप्त परिवार आहे. माधोरावचा अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबियावर दु:खाचे आघात कोसळले आहे. (तालुका प्रतिनिधी)
तारेने गळा चिरल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Updated: July 23, 2014 23:26 IST