बोंडगावदेवी : राज्याच्या जनगणना २०११ कार्यक्रमामध्ये शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी काम केले. प्रगणक म्हणून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला मिळतो. परंतु आजपर्यंत शिक्षकांना तहसील कार्यालयामार्फत पैशाचे वाटपच करण्यात आले नाही, असा आरोप राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा अर्जुनी/मोरचे उपाध्यक्ष वाय.एस. मुंगूलमारे यांनी केला आहे. शिक्षक संघाचे मुंगुलमारे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार जनगणना २०११ कार्यक्रमामध्ये तालुक्यातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी प्रगणकाचे काम केले. कामाचा मोबदला म्हणून प्रति प्रगणक ७०० रुपये तहसील कार्यालयात जमा झाल्याचे समजते. परंतु पैशाचे वाटप अजुनपावेतो करण्यात आले नाही. तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे बँक खाते नंबर शिक्षण विभागाला मागितले, परंतु त्यांनी दिले नसल्याचे ते सांगतात. तर पं.स. शिक्षण विभाग बँक खात्याची यादी तहसील कार्यालयाला पोहचती केल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मुंगूलमारे यांनी केला आहे. जनगणना २०११ च्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या ४५ दिवसांच्या मान्य रजा तहसील कार्यालयाने प्रमाणपत्र न दिल्यामुळे शिक्षकांच्या सेवा पुस्तिकेत नोंद होवू शकल्या नाही, असे पत्रकात नमूद केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना अजुनपावेतो मोबदला मिळाला नसल्याचेही प्रसिद्धीपत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधितांनी शिक्षकांना त्वरीत पैशाचे वाटप करण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा अर्जुनी/मोर उपाध्यक्ष वाय.एस. मुंगुलमारे यांनी केली आहे.(वार्ताहर)
जणगणनेतील प्रगणक मोबदल्यापासून वंचित
By admin | Updated: August 9, 2014 00:49 IST