मोहाडी : मोहाडी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी झाली असून येथील एक्सरे मशीन नादुरुस्त आहे. इसीजी मशीन कधी चालू तर कधी बंद असते. डॉक्टरांची दोन पदे रिक्त आहेत. भेषज अधिकाऱ्याची जागा अनेक वर्षापासून रिक्त आहे. प्रभारीवर सर्व कारभार सुरू आहे. त्यामुळे या विभागातील रुग्णांची हेळसांड होत आहे. मोहाडी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षा उत्तम प्रकारची सेवा या रुग्णालयात मिळेल अशी लोकांची समज होती. मात्र या ग्रामीण रुग्णालयात आल्यावर लोकांचा भ्रमनिराश होतो. येथे आलेल्या रुग्णाां सोयीसुविधा नसल्याने सरळ भंडाराच्या सामान्य रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे आता या रुग्णालयाची गरजच काय असा प्रश्न करण्यात येत आहे. येथे लाखो रुपये खर्च करुन आॅपरेशन थियेटर बनविण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने हे आधुनिक प्रकारचे आॅपरेशन थियेटर धुळखात पडलेले आहे. पूर्वी एक्स-रे मशीनमुळे अनेक गरीबांना त्याचा लाभ होत होता. परंतु मागील दोन वर्षापासून ती नादुरुस्त आहे. तिची स्थिती भंगारासारखी झाली आहे. नवीन एक्सरे मशीन या रुग्णालयाला देण्यात आली नाही. परिणामी क्षयरोगाचे रुग्ण किंवा इतर दुखापतीचे रुग्णांना एक्सरे काढण्यासाठी तुमसर किंवा भंडाराला जावे लागते. येथे इसीजी मशीन आहे परंतु तिही बरोबर काम करीत नाही. कधी तिचा प्रिंटर खराब होतो तर कधी मशिनच चुकीचा निदान करुन रोग्याला घाबरवून सोडते. मोहाडी ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षक, दोन एमबीबीएस डॉक्टरची त्वरित नियुक्ती करावी, एक्सरे मशीन लावण्यात यावी, तसेच उत्तम प्रसुती सेवा उपलब्ध करुन द्यावी. शासन एकीकडे ग्रामीण भागातील जनतेला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याचा दावा करीत असली तरी या विपरीत स्थिती मोहाडी ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना माहिती असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. या समस्येकडे लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी येथील जनतेची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण रुग्णालयाचा कारभार प्रभारींवर
By admin | Updated: August 7, 2014 23:46 IST