कोंढा येथील घटना : संतप्त जमावाने जाळला मिनीडोर, अग्निशमन वाहनाची तोडफोड पालोरा चौ. / कोंढा : शाळा आटोपून सायकलने घरी परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या समुहाला भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. ही घटना बुधवारला सकाळी ११.३० वाजता भंडारा-पवनी राज्य मार्गावरील कोंढा येथे घडली. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी या वाहनाला जाळले. वाहनातून आगीचा डोंब उसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. दरम्यान, काही काळ वातावरण संतप्त होते. घटनास्थळावरून वाहनचालक पसार झाल्यामुळे तो बचावला. नाहीतर अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शिच्या चर्चा होत्या.स्वाती केवळराम मैदलकर (१७) रा.तेलोता (खैरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. जखमींमध्ये अक्षय विनायक तुडसकर (१७) रा.आकोट, निखील सुहास देशमुख (१६) आकोट, आकाश भगवान देशमुख (१७) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे चारही विद्यार्थी कोंढा येथील गांधी विद्यालयातील आहेत. गांधी विद्यालय भंडारा- पवनी राज्यमार्गाला लागून आहे. या विद्यार्थ्यांची सकाळची शाळा होती. स्वाती मैदलकर ही अकरावी कला शाखेची विद्यार्थिनी होती. जखमी विद्यार्थी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. दररोजप्रमाणे हे विद्यार्थी ११.३० वाजता शाळा सुटताच गावाकडे जात असताना भंडाराकडून पवनीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने या विद्यार्थ्यांच्या समहाला धडक दिली. यात स्वातीचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी जखमी झाले. सायंकाळी तहसीलदार वासनिक यांनी निवेदन स्विकारल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (वार्ताहर)पोलिसांविरूद्ध असंतोषकोंढा कोसरा येथे मागील अनेक वर्षापासून पोलीस चौकी आहे. मात्र येथे एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलीस विभागाविरूद्ध जमावाने नारेबाजी करीत राज्यमार्ग काहीवेळ रोखून धरला. दरम्यान जमावाने जाळलेले वाहन विझविण्यासाठी आलेल्या अग्नीशामन वाहनाची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.
भरधाव वाहनाने विद्यार्थिनीला चिरडले
By admin | Updated: September 29, 2016 00:31 IST