व्यथा साकोली कृषी विज्ञान केंद्राची : माती परीक्षणासाठी तज्ज्ञ नाही, दोन अधिकाऱ्यांवर सुरू आहे केंद्राचा डोलाराशिवशंकर बावनकुळे साकोली दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार ठरणाऱ्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत येणाऱ्या साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रात रिक्त पदाअभांवी प्रशिक्षण व संशोधनाला ब्रेक लागला आहे. केवळ दोन कर्मचाऱ्यांवर या केंद्राचा डोलारा आहे. फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहनही तज्ज्ञांअभावी जागेवर आहे. जिल्ह्यातील शेतकरी या केंद्राच्या मार्गदर्शनावर अवलंबून आहे. विविध पिकांवरील किडीवर मार्गदर्शन करण्यासाठी किटकशास्त्रज्ञ हे पद आहे. परंतु पाच वर्षापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धानावर कोणते औषध फवारणी करायचे, कुठले खत कमी खर्चात प्रभावी ठरेल हे सांगणारे या केंद्रात नाही. औषधी विक्रेते शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत दुकानदाराला जादा कमिशन असणारी किटकनाशके, खते विकतात. अनेक शेतकरी फळशेती, फुलशेती, भाजीपाला पीक याकडे वळलेले आहे. परंतु यावर कोणती प्रभावी औषधे व खते वापरावी याचे ज्ञान किटकशास्त्रज्ञ हे पद रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. यासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तज्ज्ञ हे पदही रिक्त आहे. जनावरांचा चारा महाग झाला असून चाऱ्यावरील खर्च कमी करणे, चांगल्या प्रतीचे जनावरे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे, संकरीत उत्तम दर्जाची पिल्ले तयार करणे, यांचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून होते. पूर्वी पोल्ट्रीफार्मात शेकडो शेळ्या विविध जातीच्या कोंबड्या गाई, म्हशी होत्या. कर्मचाऱ्यांअभावी सर्व गोठे, कोंबड्याची बेंडवे रिकामी पडलेली आहेत. शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाची कोंबड्याची पिल्ले लसीकरण करून केंद्रातून घेता यायची. या लाभांपासून शेतकरी वंचित ठरत आहे. कुठल्या मातीत कुठले फळपीक घेता येईल, फळांचे उत्पादन वाढणे, विक्री कुठे करणे, तसेच फळावर प्रक्रिया करून पक्का रस, ज्युस, लोणचे, विविध पदार्थ बनविणे यासाठी फळशास्त्रज्ञ हे पद आहे. त्यांच्याकडून प्रशिक्षण मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. परंतु हे पद रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शनापासून मुकावे लागत आहे. गृहविज्ञान तज्ज्ञांकडून शेतकरी महिलांना कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनविणे, घरच्या घरी शेतमालावर व्यवसाय करणे, कुपोषण कमी करण्यासाठी अन्न प्रक्रिया शेतमालावर करून उपयुक्त साहित्य बनविणे व उत्पादनात भर पाडून आर्थिक लाभ मिळविण्यासाठी गृहउद्योगाचे प्रशिक्षण देणारे पदही पाच वर्षापासून रिक्त आहे. विस्तार अधिकारी हे शेतकऱ्यांपर्यंत नवीन संशोधन पोहचवतात. प्रसार व प्रचार सभा, प्रशिक्षण, प्रत्यक्ष बांधावर भेट देऊन शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धतीची माहिती देतात. या ज्ञानापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित झाला. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणारे हे केंद्र रिक्त पदामुळे अडचणीत आले आहे.दरवर्षी अवकाळी पाऊस, अवर्षण, किडीची साथ, उत्पादनात येणारी घट यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतात येणाऱ्या अडचणी कुणाकडून सोडवाव्या, अशा प्रश्नात शेतकरी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रात दोन फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा दिल्या आहेत. परंतु माती परीक्षणासाठी या केंद्रात तज्ज्ञ नाही. एकाचवेळी १०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा केंद्रात आहे. परंतु प्रशिक्षण देणारे तज्ज्ञही नाही. शेतकऱ्यांना विविध अवजारे प्रात्यक्षिकांसाठी केंद्रात उपलब्ध आहेत. परंतु अभियंता नसल्यामुळे अवजारे शोभेच्या वस्तू ठरलेल्या आहेत.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्र ही केंद सरकारची योजना आहे. रिक्त पदे भरण्याचे अधिकार अकोला येथील डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाला आहेत. याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे.- डॉ.उषा डोंगरवार,कार्यक्रम समन्यवक, कृषी विज्ञान केंद्र साकोली.
शेतकरी प्रशिक्षण व संशोधनाला ‘ब्रेक’
By admin | Updated: June 9, 2016 00:37 IST