भावाचा आरोप : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींतर्फे केला जायचा छळभंडारा : पैशाच्या तगाद्यासाठी विवाहित बहिणीची शारीरिक व मानसिक छळ करून तिची हत्या केली. यास सासरकडील मंडळी जबाबदार असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला आहे. मृत संगीता नंदवर्धन शेंडे हिचा विवाह १९ मे २००८ ला देवरीगोंदी येथील नंदवर्धन शेंडे याच्याशी झाला होता. संगीता आरोग्य सेवकपदी नोकरीस होती. विवाहानंतर दोन महिन्यांनी पती नंदवर्धनने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण सुरु केली होती. नोकरीवर असलेल्या ठिकाणी पती जाऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्याच्यासोबत जावई शशिकांत मेश्राम, बहीण तिरुतम्मा मेश्राम व धम्मज्योती लाडे तिघेही तिच्या खोलीवर जाऊन माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत होते. राईस मिल बांधण्यासाठी पैशाची गरज असल्याने घरून पैसे आणण्यासाठी ते तिला मारहाण करीत होते. या जाचाला कंटाळून १६ एप्रिल २०१४ ला संगीता मुल येथे सासरी आली होती. त्यानंतर २१ एप्रिल रोजी नंदवर्धन याने घरी येऊन बहिणीला कोणताही त्रास देणार नसल्याची हमी देत सोबत गेले. मात्र त्यानंतरही सासरकडील मंडळीकडून बहिणीचा छळ सुरुच होता. पती, सासरा, दोन्ही नणंद व नंदई यांच्याकडून त्रास होत असल्याचे संगीता माहेरच्या लोकांना फोनवरुन सांगत होती. १० मे रोजी तिच्या घरी गेलो असता बहिणीने १ लाख रुपये आणण्यासाठी त्रास देत असल्याचे सांगितले. २५ मे रोजी नंदवर्धन व त्याच्या घरच्या लोकांनी स्टँप पेपरवर लिहून चांगल्या वर्तणुकीची हमी दिल्याने बहिणीला पुन्हा सासरी पाठविले. १४ आॅगस्टला ती रक्षाबंधनासाठी माहेरी येणार होती. या संदर्भात फोन केला असता पती नंदवर्धनने उडवाउडवीचे उत्तर देऊन वाद घातला. १५ आॅगस्टला अचानक बहिणीच्या मृत्यूची बातमी अज्ञात एका व्यक्तीने फोनवरून दिली. तिने गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. मात्र तिचा मृत्यू नसून सासरकडील मंडळींनी तिला मारल्याचा आरोप भावाने केला आहे. तिच्या घरातील खोलीत संशयास्पद वातावरण आढळून आले. याबाबत शेजाऱ्यांकडून मृतक संगीताला मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली. बहिणीची आत्महत्या नसून हुंड्यासाठी तिचा सासरकडील मंडळींनी हत्या केल्याचा आरोप भावाने केला असून पती नंदवर्धन शेेंडे, हरबा शेेंडे, शशीकांत मेश्राम, तिरुत्तमा मेश्राम, धम्मज्योती लाडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी मृतक संगीताचा भाऊ बाबाराव मेश्राम यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
बहिणीच्या हत्येला सासरची मंडळी जबाबदार
By admin | Updated: August 25, 2014 23:49 IST