तुमसर : तुमसरातील सराफा व्यापारी संजय सोनी पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपीपैकी पाच आरोपीविरूद्ध मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधीत कायदा) अंतर्गत कारवाईची मागणी न्यायालयाकडे केली आहे. तसा अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाने गृहमंत्रालयाकडे पाठविला आहे.काल जिल्हा पोलिसांनी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात या सात आरोपींना हजर केले होते. दि.२६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल या तिघांची सात दरोडेखोरांनी हत्या केली होती. हत्याकांडातील शाहनवाज उर्फ बाबु सत्तार शेख (२२) रा.तुमसर, महेश आगासे (२६) रा.तुमसर, सलीम नजीर खान पठाण (२४) रा. तुमसर, राहुल पडोळे (२२) रा.तुमसर, सोहेल शेख (२६) रा.नागपूर, केसरी ढोले (२२) रा.तुमसर, रफीक शेख (४२) रा.नागपूर या आरोपींना तुमसर पोलिसांनी अटक केली होती. यापैकी सलीम नजीर खान पठान तुमसर व रफीक शेख नागपूर यांचेवर मोका अंतर्गत कारवाई होणार नाही, उर्वरित पाच आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई होणार असून तशी तयारी सुरू आहे. पुढील सहा महिन्यात पोलिसांना ओरापीविरूद्ध सबळ पुरावे व माहिती गोळा करणे आवश्यक आहे.२७ फेब्रुवारी रोजी आरोपीविरूद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खुनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरिता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे व २०१ पुरावे नष्ट करणे आदी कमलामन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. केसरी ढोले, महेश आगाशे व सोहेल शेख यांच्याविरूद्ध याशिवाय २०१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.तुमसर पोलिसांनी या दरोड प्रकरणात ३९ लाख ५ हजार रोख, ८३९४ किलो सोने किंमत १.६५ कोटी, चांदी ८४२ ग्रॅम किंमत १९,५००, दोन दुचाकी ७० हजार असे २.९ कोटी रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला होता. या प्रकरणात फाशीची शिक्षेची कलमे आहेत. हे प्रकरण जलद न्यायालयात असून या हत्याकांडाची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. हत्याकांडाची भीषणता लक्षात घेवून गृहमंत्रालयाने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाच आरोपींविरूद्ध मोका अंतर्गत कारवाई
By admin | Updated: August 4, 2014 23:34 IST