मोहाडी : क्षुल्लक कारणावरून २०१२ मध्ये पत्नीची हत्या करण्यात आली. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायधीशांनी आरोपी जगदीश कोठू गजभिये (७५) याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोसा टाकळी येथील जगदीश गजभिये यांचे २० जुलै २०१२ च्या पहाटेला पत्नी कांताबाईशी वाद झाला. यात वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात जगदीशने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाल्याने ओरडू लागली. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण मुलगा अतुल व सून धावत गेले. यावेळी वडिल आईला चाकूने मारीत असल्याचे दिसले. मुलगा व सून येताच जगदीश घराबाहेर पळून गेला. दरम्यान जखमी कांताबाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी अतुलने मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी जगदीशविरूद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सहकारी पोलीस हवालदार जगन्नाथ गिऱ्हेपुंजे, संदेश राऊत यांच्या सहकार्याने आरोपीविरूद्ध पुरावे गोळा केले. सदर प्रकरण न्यायदानासाठी जिल्हा सत्र न्यायालयात प्रविष्ट केले.याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकला. पुराव्याच्या आधारावर न्यायधीशांनी जगदीशला दोषी पकडून त्याला आजन्म कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात अॅड. आय.ए. सिद्धीकी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली तर आरोपीकडून अॅड. यु.के. फटी यांनी युक्तीवाद केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार शास्त्री यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)
खून प्रकरणातील आरोपीला कारावास
By admin | Updated: September 20, 2014 23:44 IST