जीर्ण ईमारत : वडद येथील प्रकार, ग्रामस्थांचा शाळा व्यवस्थपान समितीवर रोषभंडारा : वडद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी स्वत:च्या मर्जीने नागरिकांना विश्वासात न घेता स्थलांतरीत केली. यामुळे येथे शिकणाऱ्या ४० विद्यार्थ्यांची परवड होत असल्याने ते सर्व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. पहेला वरुन ७ कि.मी. अंतरावर असलेल्या वडद येथील पुनर्वसनाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. जुन्या गावठाणातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीचे होते. मात्र २६ जूनपासून शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सरपंच रचना वंजारी यांनी पालकांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेता किंवा पालकांना त्याची कल्पनाही न देता शाळा नवीन गावठाणात स्थालांरीत केली. असे करीत असताना आपल्या विश्वासातील काही लोकांना पाल्यांच्या बस पासची व्यवस्था करण्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीने केली. यात गरीब शेतमजुरांच्या ४० मुलांवर आर्थिक भुर्दंड पडला आहे. मुलांकरिता २६० रुपये व मुलींकरिता १२० रुपये बस पासकरिता पालकांना भुर्दंडू सहन करावा लागणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीने सदर बाब पालकांना न सांगितल्याने ४० विद्यार्थी बस पास अभावी शाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालकांनी शिक्षणाधिकारी घोडेस्वार यांना निवेदन दिले आहे.यावर शिक्षण विभाग किंवा शाळा व्यवस्थापन समितीने कुठल्याही पद्धतीचा तोडगा काढलेला नाही. त्यामुळे पालकांवर शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणाधिकारी यांच्याबद्दल संताप निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तातडीने थांबविण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वडदवासीयांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
४० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
By admin | Updated: July 17, 2014 23:54 IST