लाखनी : हजारो वर्षाच्या अस्पृश्यतेच्या दाहकतेतून मुक्तता करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिसूर्याने दलित, पीडित, अस्पृश्य समाजाला मुक्तपणे व स्वतंत्रतेने जीवन जगण्यासाठी भारतात रूजलेला बौद्ध धम्म दिल्याने २२ प्रतिज्ञातून बौद्धांनी आचरण केल्यास संपूर्ण जीवनच बदलून जाईल. कारण १४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्माचा स्वीकार करून लाखो बांधवांना दिशा देऊन २१ प्रतिज्ञाचे आचरण करण्यास सांगितले. त्यामुळे २२ प्रतिज्ञाच बौद्धाची आचारसंहिता आहे, असे प्रतिपादन सोहळ्याचे अध्यक्ष प्रा.युवराज खोब्रागडे यांनी केले. पंचशिल बौद्ध मंडळ कवडसी / खैरी येथील तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व बुद्ध विहाराचे अनावरण व उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रा.खोब्रागडे म्हणाले, बौद्ध धर्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठी शोधली आहे. त्यातील जवाहरांचा मुक्त वापर करा, याची आठवण करून देताना १९५६ नंतर बौद्ध धम्माविषयी आजची परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. जागतीक पातळीवर बौद्ध धम्माची उपयुक्तता यावर प्रकाश टाकला. उद्घाटक दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑप भंडाराचे संचालक विनायक बुरडे हे होते. प्रमुख अतिथी माजी पंचायत समिती सभापती दिलवर रामटेके, प्रल्हाद साखरे, हरिदास बडोले, रामकृष्ण मेश्राम, गुणीराम बोरकर, गुलाब लांजेवार, चिंधू मेश्राम, राजेंद्र खोब्रागडे, दिलीप शहारे, प्रमोद भुते, भगवान शेंडे, तुळशिराम लाडे, भाष्कर बडोले, विश्वनाथ बडोले, हरिश्चंद्र लाडे, आर.सी. फुल्लके, एन.व्ही. साखरे, भन्ते आनंद व भन्ते कश्यप आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष भाऊराव महादेव बडोले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा दान केला. तसेच मिरामंगल बडोले यांनी तथागत गौतम बुद्ध यांचा पूर्णाकृती पुतळा दान दिला. याप्रसंगी भंतेजी व प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष भाऊराव बडोले यांनी केले तर संचालन हरिश्चंद्र लाडे यांनी केले आभार प्रदर्शन आर.सी. फुल्लुके यांनी केले. या कार्यक्रमानंतर कवडसी व खैरी येथील जनतेला सामुहिक भोजनाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली. (तालुका प्रतिनिधी)
२२ प्रतिज्ञा म्हणजेच बौद्धांची आचारसंहिताच
By admin | Updated: May 22, 2014 00:53 IST