गावांना धोका नाही : ७९८९ घनमीटर पाण्याचा विसर्ग गोसे (बुज.) : विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मागील २४ तासापासून पडत असलेल्या पावसामुळे व नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांना पुर आल्यामुळे धरण पातळीत वाढ झाल्यामुळे काल रात्रीपासून धरणाची १९ वक्रदारे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.या १९ वक्रदारातून ७९८९ घनमीटर पाण्याचा विसर्ग प्रती सेकंद दराने, धरणाच्या खालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमध्ये होत आहे. त्यामुळे पूर्णपणे सुकून गेलेली वैनगंगा नदी भरून वाहत आहे. त्यामुळे धरणाखालील वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. मागील २४ तासापासून गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे मरूनदी, नागनदी व कन्हान नद्यांना मोठा पूर येवून गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढण्यास सुरवात झाली होती. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका होवू नये याकरीता धरणातील पाण्याची पातळी २३८.९०० मीटर व स्थिर ठेवून १९ वक्रदारे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. आज दुपारनंतर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात कमी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
गोसेखुर्द धरणाचे १९ दरवाजे उघडले
By admin | Updated: July 16, 2014 23:55 IST