बीड : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी नगर रोड बीड येथे संघर्षयोध्दा भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर पुतळा दहन करून राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रा. नागरगोजे, सलीम जहांगीर, विक्रांत हजारी, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, सुनील मिसाळ, लता बुंदेले, संध्या राजपूत, लता राऊत, शीतल राजपूत आदी सहभागी झाले होते. केवळ दुष्ट हेतूने केलेली १२ आमदारांची निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गमावले असून हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी राज्यात संघर्ष करतच राहील, असा इशारा याप्रसंगी बोलताना राजेंद्र मस्के यांनी दिला. ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नाही, तर केवळ वेळकाढूपणा करून ओबीसी समाजाची फसवणूक करावयाची आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक माहिती तयार करावी लागेल व केवळ मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करूनच अशी माहिती तयार करता येणार आहे, हे स्पष्ट असूनही यासंदर्भात केंद्र सरकारकडे ठराव पाठवून ठाकरे सरकार केवळ टोलवाटोलवी करत आहे, असे राजेंद्र मस्के म्हणाले.