कापूस, बाजरीचे क्षेत्र घटणार
पाटोदा : अत्यल्प सिंचन क्षेत्र व डोंगराळ भूभाग असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने खरिपाची पेरणी ५८ हजार हेक्टरपेक्षा जास्त होण्याची शक्यता असून, यंदा खरीप हंगामात सोयाबीन व तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
बीड जिल्ह्यात पाटोदा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. ८१ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या पाटोदा तालुक्यात खरीप हंगामात ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. गेल्या खरीप हंगामात झालेला समाधानकारक पाऊस व यंदाही हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याची वर्तविलेली शक्यता लक्षात घेता यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.
अत्यल्प सिंचन क्षेत्र असलेल्या पाटोदा तालुक्यात खरीप हंगामात बाजरी हे महत्त्वाचे पीक होते; मात्र तालुक्यात सिंचन तलाव, पाझर तलाव व साठवण तलावांची संख्या गेल्या १०-१५ वर्षांत वाढल्याने बाजरीची जागा सोयाबीन या नगदी पिकाने घेतली आहे. गेल्या खरीप हंगामात तालुक्यात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात दोन ते तीन हजार हेक्टर वाढ होणार आहे.
खरीप हंगामात तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, मूग व उडीद या पिकांची पेरणी केली जाते. यंदा कापूस या पिकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन व तुरीचे क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक राहिली. त्यामुळे तलावातील पाणीसाठे चांगले राहिल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला नाही. यंदा पावसाचे पाणी या तलावात येईपर्यंत सध्याचे पाणी पिण्यासाठी पुरणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरातील वापरावे; मात्र या बियाणांची उगवण क्षमतेची चाचणी करावी. बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
- गांगुर्डे,
तालुका कृषी अधिकारी पाटोदा.