राम लंगे/
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : तालुक्यात एकूण १४ तलाठी सज्जा असून त्या अंतर्गत ४२ महसुली गावे आहेत. मात्र, तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद केवळ दोनच केंद्रांवरच घेतली जात आहे. परिणामी, अनेकदा अचूक नोंद होत नसल्याने सज्जा निहाय पर्जन्यमापक बसविण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
७०१.८० मिमी अशी वडवणी तालुक्यातील पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी आहे. जुलै महिन्यात फक्त वडवणी मंडळात २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात ४८ गावांचा समावेश आहे. तर कवडगाव, वडवणी ही दोन महसूल मंडळ आहेत. फक्त वडवणी मंडळात १९ गावे तर कवडगाव मंडळात २३ गावे आहेत. तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद या दोन महसूल मंडळातील पर्जन्यमापकांवर घेतली जाते. त्यावरून संपूर्ण तालुक्यातील गावातील पावसाची सरासरी गृहित धरली जाते. या आकडेवारीनुसार शासनाच्या योजनांचा लाभ दिला जातो अथवा नियोजन ठरविले जाते. गेल्या काही वर्षांपासून पाऊस लहरी स्वरूपाचा होत आहे. कधी गावात कमी पाऊस असतो तर त्याच गावच्या शिवारात अधिक पाऊस असतो. याशिवाय काहीवेळा गावात अधिक पाऊस असतो. परंतु, शेतात पावसाचा थेंबही नसतो. एका शिवारात पाऊस होतो तर दुसऱ्या शिवारात पाऊस नसतो, अशी नैसर्गिक परिस्थिती आहे.
....
अचूक मूल्यमापन होत नाही
प्रत्येक गावात झालेल्या पावसाचे अचूक मूल्यमापन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा फटका बसत आहे. विशेषतः पीक विम्याच्या आर्थिक मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात गावनिहाय अथवा किमान तलाठी सज्जा निहाय ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे