बीड : माजलगाव उपविभागीय कार्यालयातील जातप्रमाणपत्र विभागाच्या लिपिकासह खासगी एजंटास ३० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी बीडच्या एसीबीने रंगेहाथ पकडले होते. यातील दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. याचवेळी न्यायालयाने उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांचाही यात सहभाग आहे की नाही? हे तत्काळ निश्चित करा, अशा सूचना एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत परंतु बाफना फरार असल्याने एसीबीने कार्यालयास पत्र दिले आहे. त्यामुळे लाचेच्या प्रकरणात बाफनाहीदेखील अडकण्याची दाट शक्यता आहे.तक्रारदाराने आपल्या दोन मुलांसह भावाची दोन मुले आणि बहिणीच्या जात प्रमाणपत्रासाठी माजलगाव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यातील चार प्रमाणपत्र दिले तसेच बहिणीचे राहिलेले प्रमाणपत्र आणि दिलेल्या चार प्रमाणपत्राचा मोबदला म्हणून या विभागाचा कारभार पाहणारा वैभव जाधव या लिपिकाने ५० हजार रूपयांची लाच मागितली. त्यातील ३० हजार रुपये खासगी एजंट अशपाक शेख याच्यामार्फत घेताना जाधव याला एसीबीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर नीलम बाफना यांनी अर्धवट जेवण सोडून चालकाच्या गाडीवर बसून धूम ठोकली होती.
दरम्यान, यातील जाधव व शेख या दोन्ही आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली. सोबतच माजलगावच्या एसडीओ नीलम बाफना यांचा यात कसा सहभाग आहे? हे तत्काळ निश्चित करा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्याप्रमाणे एसीबीने बाफना यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पत्रही तयार केले. परंतु त्या फरार असल्याने त्यांच्याकडे हे पत्र पोहचले नाही. त्यामुळे हे पत्र त्यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे. एसीबीकडून आता बाफना यांच्याबाबत कसा तपास केला जातो? याकडेही लक्ष लागले आहे.दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे तसेच विभागप्रमुख असलेल्या एसडीओ नीलम बाफना यांचा यात कसा सहभाग आहे? हे निश्चित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्याप्रमाणे पत्र तयार केले, परंतु त्या हजर नसल्याने हे पत्र कार्यालयात दिले आहे. दोन दिवसांत चौकशीसाठी न आल्यास जिल्हाधिकारी यांना बाफना यांना हजर राहण्याबाबत आदेशित करावे, असे पत्र दिले जाणार आहे.शंकर शिंदे, उपअधीक्षक, एसीबी बीड