लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गाव, वस्त्या, वाड्या, डोंगरी भागात शेतकरी राहतात. त्यांना हवामानाबद्दल माहिती मिळावी तसेच आपल्या परिसरात वातावरण पुढील काही दिवसात कसे असणार आहे. जेणेकरून त्यासंदर्भात तयारी करता येईल, यासाठी ‘किसान ॲप’ काढण्यात आले होते. दरम्यान, किसान ॲपवर वेळेवर माहिती मिळत नसून, आपत्ती येऊन गेल्यानंतर त्याची माहिती मिळते. त्यामुळे किसान ॲपचे वरातीमागून घोडे अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील पिके ही सर्वतोपरी हवामानाच्या अंदाजावर तग धरून असतात. वातावरणाचा अंदाज जर काही दिवस आधी कळला तर होणारे नुकसान काही प्रमाणात कमी करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करू शकतात. त्यासाठी किसान ॲपची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. तर, अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल फोनमध्ये हे ॲपदेखील आहे. तसेच या संदर्भात हवामानासंदर्भातील संदेशही मोबाईलवर येतात. मात्र, वादळ, वारे, अवकाळी पाऊस झाल्यानंतर हे संदेश येत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत असून, बहुतांश शेतकऱ्यांनी ॲप बंद केले आहे. अनेकांना या हवामान अंदाजाच्या ॲपबद्दल माहितीच नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अचूक हवामान अंदाज शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासनाकडून विशेष उपाययोजना कराव्यात, जेणेकरून होणारे नुकसान कमी करण्यास शेतकऱ्यांना मदत होईल, अशी मागणी करण्यात येत आहे.
किसान ॲपवर काय मिळते माहिती?
दररोज त्या-त्या भागातील हवामानाचा अंदाज देण्यासाठी या ॲपची निर्मिती केली आहे.
शेती आणि शेतांमधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर शेतकऱ्यांना मिळते.
कीडरोग नियंत्रण तसेच खतांचा वापर, माती परीक्षण यासह विविध विषयांचे मार्गदर्शनही दिले जाते.
हवामानात बिघाड होणार असेल जसे की, चक्रीवादळ, अतिवृष्टी, वादळ याचा होणारा पिकांवरील परिणाम ही माहिती मिळणे अपेक्षित आहे.
अपडेट वेळेवर मिळावे
शेतकऱ्यांना वेळेमध्ये संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. हवामानाचा अंदाज वेळेपूर्वी किमान ४८ तास आधी मिळाल्यास कृषी क्षेत्रातले नियोजन करण्यास शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळू शकतो. शेतकऱ्यांना विविध योजना व नवीन तंत्रज्ञानाची माहिती या ॲपवर मिळावी.
हवामानाचा अंदाज मिळाला तर नुकसान होणार नाही
या ॲपवर मिळणारी माहिती उशिरा प्राप्त होते. त्यामुळे मी हे ॲप बंद करून टाकले आहे. शासनाने एक चांगला उपक्रम राबविला आहे. त्यासाठी खर्चदेखील करण्यात येतो. मात्र, माहिती उशिरा मिळत असल्यामुळे या ॲपचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.
- अशोक सुखवसे, शेतकरी, वरवटी
..................
ॲपवर माहिती तत्काळ मिळाली तर शेतात उघड्यावर असलेले खळे झाकता येते. तसेच इतर काही कामे करून नुकसान टाळता येऊ शकते. मात्र, ॲपवर माहिती मिळत नसल्यामुळे नुकसान होते. त्यामुळे ही यंत्रणा शासनाने योग्यरित्या कार्यान्वित करावी.
- चंद्रकांत जगताप, शेतकरी, पालसिंगन
............
पशुपालक शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हवामान अंदाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे वेळेवर हवामानासंदर्भात माहिती मिळणे गरजेचे आहे. दरम्यान, त्या ॲपवर शेती व पशुपालन यामध्ये प्रगती करण्यासाठी योग्य ती माहिती वेळोवेळी देण्यात यावी.
- सुरेश पिंपळे, शेतकरी, रामनगर.