बीड : भंडारा येथील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या. त्यात बीड जिल्ह्यातील मोठ्या असलेल्या १८ संस्थांचे ऑडिट झाले असून एकाही संस्थेत आगीबाबत काहीच उपाययोजना नाहीत. अग्निशमन विभागाने नुकताच सादर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्वांचाच जीव धोक्यात असल्याचे दिसते.
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह महिला, ग्रामीण, उपजिल्हा, कुटिर, वृद्धत्व अशा १८ आरोग्य संस्था आहेत. भंडारा दुर्घटनेनंतर बीडच्या अग्निशमन विभागाकडून सर्वच आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्यात आले; परंतु, एकाही संस्थेत आगीबाबत १०० टक्के उपाययोजना दिसल्या नाहीत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास ती आटोक्यात कशी आणायची, हा प्रश्न आजही कायम आहे. अग्निशमन विभागाने नुकताच हा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर केला आहे. याला आठवडा उलटूनही याबाबत रुग्णालयांमध्ये उपाययोजना सुरू झाल्याचे कुठेही दिसत नाही.
काय आहेत त्रुटी?
अग्निरोगधक यंत्र आहेत परंतु, त्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे. आपत्कालीन मार्ग बंद आहेत. इलेक्ट्रीक वायरिंगचे जोड निसटलेले असून ठिणग्या पडण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वेस्ट मटेरियार टाकलेले आहे. स्मोक डिटेक्टर नाही. या त्रुटी सर्वच आरोग्य संस्थांमध्ये असल्याचे फायर विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
लोखंडीत सुविधा आहे, पण बंद अवस्थेत
लोखंडी सावरगावच्या २० कोटींच्या इमारतीत आगीबाबत उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु, त्या बंद अवस्थेत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच इमारतीच्या मागे आग लागली होती. सुदैवाने रुग्णालयापासून ती दूर अंतरावर असल्याने धोका टळला होता. असे असतानाही बीडच्या अधिकाऱ्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही.
१२० दिवसांची मुदत
अहवाल सादर केल्यापासून १२० दिवसांत याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याबाबत अग्निशमन विभागाने महाराष्ट्र अग्निशमन व जीव संरक्षक कायदा २००६ (२००७ महा-३) नियम २००९ यातील कलम ६ व नियम ९ (१) नुसार जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले आहे.
कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात
सामान्यांच्या जीविताचा प्रश्न असतानाही जिल्हा शल्यचिकित्सकांकडून बांधकाम विभागाला दुरूस्तीबाबत पत्र दिल्याचे सांगत हात झटकले आहेत. केवळ कागदी घोडे नाचविण्यात येथील अधिकारी धन्यता मानतात. त्याचा त्रास सामान्यांना होत आहे. विशेष म्हणजे भंडाऱ्यातील दुर्दैवी घटना डोळ्यांसमाेर असतानाही बीडच्या अधिकाऱ्यांना याबाबत काहीच गांभीर्य नसल्याचे दिसते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते म्हणाले, याबाबत बांधकाम विभागाला पत्र दिले आहे.
कोट
जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट पूर्ण करून जानेवारी महिन्यातच अहवाल दिला आहे. त्यात सर्वच आरोग्य संस्थांमध्ये आगीच्या उपाययोजनांबाबत त्रुटी आढळल्या आहेत. १२० दिवसांत दुरूस्ती करावी, याबाबत पत्र दिले आहे.
बी. ए. धायतडक, प्रमुख अग्निशमन विभाग, न. प. बीड