मेंदूच्या आकारावर ठरतो ‘पीटीएसडी’चा उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 18:46 IST
पीटीएसडीने ग्रस्त व्यक्तीच्या मेंदूचा ‘हिपोकॅम्पस’ भाग जर आकाराने मोठा असेल तर एक्सपोजर-बेस्ड थेरेपीचा अधिक फायदा होतो.
मेंदूच्या आकारावर ठरतो ‘पीटीएसडी’चा उपचार
एखाद्या अत्यंत भीतीदायक परिस्थितीला (उदा. युद्ध, प्रियजनांंचा मृत्यू) सामोरे जावे लागल्यामुळे अनेक लोक सतत तणावाखाली वावरत असतात.अशा मानसिक आजाराला ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर’ (पीटीएसडी) म्हणतात. अशा मानसिक आजाराने त्रस्त लोकांच्या मेंदूचा एक विशिष्ट भाग आकाराने मोठा असेल तर ते ‘पीटीएसडी’च्या उपचारांना अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. ‘पीटीएसडी’वर इलाज करण्यासाठी एक्सपोजर-बेस्ड थेरेपीचा उपयोग केला जातो. ही एक प्रकारची कॉग्नेटिव्ह बिहेव्हिएरल थेरपी आहे.नव्या संशोधनात असे दिसून आले की, जर पीटीएसडीने ग्रस्त व्यक्तीच्या मेंदूचा ‘हिपोकॅम्पस’ भाग जर आकाराने मोठा असेल तर त्या व्यक्तीला एक्सपोजर-बेस्ड थेरेपीचा अधिक फायदा होतो.हिपोकॅम्प्स भागात भीती आणि सुरक्षा या दोन बाबींचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे मेंदूचा आकार जर मोठा असेल तर पीटीएसडी रुग्णांना वास्तव आणि भ्रामक कल्पना यांमधील फरक अधिक चांगल्या प्रकारे कळतो. कोणत्या बाबीचा आपल्याला धोका आहे आणि कोणती गोष्ट सुरक्षित आहे याची जाण हिपोकॅम्पस भागावर अवलंबून असते.यापूर्वी झालेल्या रिसर्चमधून असे दिसून आले की, हिपोकॅम्पस भागाचा आकार तुलनेत लहान असेल तर ‘पीटीएसडी’ने ग्रस्त होण्याचा धोका वाढतो. कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर (सीयूएमसी) येथील प्राध्यापक युवल नेरिया यांनी माहिती दिली की, पीटीएसडी रुग्णांवर उपचार करण्याच्या पद्धतीवर आमच्या संशोधनाचा फार उपयोग होणार आहे.