फोटो - ०७एएमपीएच०६, ०७एएमपीएच०७
मोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणले जाणारे अप्पर वर्धा प्रकल्पाचा जलसाठा मंगळवारी ९३ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख व कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यानंतर धरणाची दोन दारे दुपारी ४ वाजता पाच सेंटिमीटरने उघडण्यात आली. त्यामधून १६ दलघमी प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठी येत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असून नदी-नाल्या पूर्णतः ओसांडून वाहत आहेत. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे मध्य प्रदेश येथील जाम नदी, पाक नदी, सालबर्डी येथून वाहणारी माडू नदी तसेच दमयंती, नळा नदीलासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अप्पर वर्धा धरणात पाण्याची आवक वाढली. परिणामी धरण ९३ टक्के भरले. त्यामुळे आता पर्यटकांना उत्सुकता लागलेले हे नयनरम्य दृश्य बघण्याचा योग प्राप्त झाला आहे.
मोर्शी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी असून सध्या अप्पर वर्धा धरणाची पातळी ३४२.३ मीटर झाली आहे. या धरणामधून अमरावती, मोर्शी यासारख्या मोठ्या शहराला पिण्याचे पाणी पुरविले जाते. सिंचनाकरिता कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. याच धरणातील पाण्यावर मोर्शी तालुक्यासह वरूड, तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असते.
सप्टेंबर महिन्यात अप्पर वर्धा धरण क्षेत्रात चांगला पाऊस कोसळल्याने धरण निर्धारित पातळी गाठून १३ दारे उघडली जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे. उपविभागीय अभियंता रमण लायचा, गजानन साने व अप्पर वर्धा धरणाचे कर्मचारी पर्यचकांना आवरण्यासाठी सज्ज आहेत. दारे उघडण्यात येत असल्याचे वृत्त कळताच जिल्ह्यातील पर्यटक पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी धरण परिसरात गर्दी करीत आहेत.