अमरावती : जिल्ह्यामधील नऊ नगरपरिषद उपाध्यक्षपदांची निवडणूक शुक्रवार २७ जून रोजी होत आहे. या निवडणूक प्रक्रियेला अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे उपाध्यक्ष यांनी नागपूर उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याची गुरुवारी सुनावणी झाली. उर्वरित सुनावणी उद्या शुक्रवारी होत आहे. दरम्यान शुक्रवारलाच निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने दुपारी १२ पर्यंत निर्णय आल्यास निवडणूक कार्यक्रम बाधित होऊ शकतो. अन्यथा सर्व प्रक्रिया सुरळीत होणार आहे. जिल्ह्यातील चिखलदरा वगळता उर्वरित नऊ नगरपरिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार २७ जून रोजी होत आहे. शासनाने १० जून २०१४ रोजी राज्यातील सर्व नगराध्यक्ष पदाला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे केवळ उपाध्यक्षपदांची निवडणूक होत आहे. या निर्णयाला बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिका उपाध्यक्षांनी आव्हान दिले. त्या ठिकाणी स्थगनादेश मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील उपाध्यक्ष वैभव लेंधे यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाद मागितली; याची सुनावणी बुधवारी होती. नंतर ती गुरूवारी घेण्यात आली आणि उर्वरित शुक्रवारी होत आहे. परंतु निवडणूक प्रक्रियादेखील शुक्रवारीच असल्याने दुपारी १२ पर्यंत निर्णय आल्यास प्रक्रिया बाधित होऊ शकते. आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवीत आहोत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शुक्रवारी उपाध्यक्षांची निवडणूक, याचिकेची सुनावणीही उद्याच
By admin | Updated: June 26, 2014 23:00 IST