अमरावती : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी परीक्षा न देता पहिली ते आठवीच्या मुलांना पुढच्या वर्गात ढकलगाडी मिळणार आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे पडसाद बघता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘ना परीक्षा, ना अभ्यास’ पुढील वर्गात प्रवेश दिले जाणार आहे. या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ्जांनी स्वागत केले. वर्ष वाचले, पण अभ्यास बुडाला अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ‘प्रमोट’ केले जाणार आहे. गतवर्षी मार्च २०२० मध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावर राज्यात कोरोनाचे आगमन झाले. सरकारने संक्रमण टाळण्यासाठी तब्बल तीन महिने लॉकडाऊन केले. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. परीक्षा रद्द करण्ळाचा प्रसंग ओढवला. शासनाने गतवर्षीही ना परीक्षा, ना अभ्यास अशीच पुढच्या वर्गात ढकलगाडी केली. सन २०२०-२०२१ या सत्रात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे प्रवेशद्धारही पाहिले नाही. वर्गच
भरले नाही. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. मात्र, शिक्षक काय म्हणाले, हे विद्यार्थ्यांना कळलेच नाही. मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपवर मुले ऑनलाईन शिक्षणाच्या नावे खेळखंडोबा करीत असल्याचा अनेक पालकांना अनुभव आला. पहिली ते चौथीचे वर्ग उघडलेच नाही. काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास पूर्ण केला. परंतु, ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. कोरोना संसर्गामुळे शिक्षण क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. उद्भवलेली परिस्थिती बघता पहिली ते आठवीच्या मुलांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.
--------------
दृष्टिक्षेपात
जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या शाळा : २८९४
पहिली ते आठवीचे विद्यार्थी : ३,५१,००९
--------------------
कोट
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. महामारीच्या गंभीर प्रसंगी विद्यार्थ्यांच्या जिविताशी खेळणे याेग्य नाही. त्यामुळे पहिली ते आठवीच्या मुलांची परीक्षा न घेण्याचा निर्णय बरोबर आहे.
- प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
---------
कोट
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांशिवाय आरटीई कायद्यानुसार पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय योग्य आहे. तशी शिक्षक, पालक संघटनांची मागणी होती. शालेय शिक्षण मंत्रच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण, पुढील शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष अध्यापनासाठी शाळा सुरू व्हाव्यात.
- योगेश पखाले, शिक्षक. वडाळी
------------
कोट
काळ वाईट आहे. कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे, दुसरी लाट पूर्वीपेक्षा जास्त घातक आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय स्वागतयोग्यच आहे. परीक्षा नव्हे विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे. परिस्थिती लक्षात घेता सकारात्मक निर्णय आहे.
- शरद तिरमारे, मुख्याध्यापक, दाभा
----------------
पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या
अचलपूर: ३५१५८
अमरावती : १९५४२
अंजनगाव सुर्जी: २००७३
भातकुली: १०४०५
चांदूर बाजार: २२९१३
चांदूर रेल्वे: १०२१९
चिखलदरा: १५३७२
दर्यापूर: १९१६७
धामणगाव रेल्वे : १४६१०
धारणी: २८९२२
मोर्शी: १९६८४
नांदगाव खंडेश्वर : ११३५९
तिवसा: १२८९५
वरुड :२५३६५
महापालिका क्षेत्र: ८५३२५