अमरावती : चार दिवसांपूर्वी २२ डिग्री सेल्सिअसवर आलेले तापमान आता पुन्हा ३३ डिग्रीवर पोहोचले आहे. भर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ७ डिग्री सेल्सिअसने तापमान वाढल्याने पिकाची स्थिती ढासळत असून उकाड्याचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा वाढली आहे.मागील आठ दिवसांपासून पाऊस बंद झाला असून सूर्याने डोके वर काढले आहे. पावसामुळे निर्माण झालेले थंड वातावरण पुन्हा गरम व्हायला लागले आहे. पाऊस बरसण्यासाठी पूरक असे वातावरण तयार होत नसल्याने पाऊस पुन्हा ओसरला आहे. मागील आठ दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा नाहीसा झाल्याने पुन्हा पावसाला बे्रक बसले आहे. कमी दाबाचा पट्टा गेल्याने ढग उत्तरेकडे ओढले गेले आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड व गुजरात या भागाकडे ढगाचा प्रवाह गेला आहे. आता पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास विदर्भात पाऊस पडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मात्र सद्यस्थितीत असा योग दिसत नसल्याने किमान ३-४ दिवस तरी पाऊस येण्याची शक्यता नाही. यंदा कमी दिवसांमध्ये अधिक पाऊस बसला असून पाण्याची पातळी वाढली आहे. कधी उघाड तर कधी तुरकळ पाऊस असे वातावरण असल्यामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाला आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये पाऊस न आल्यास शेतकऱ्यां्ना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
चार दिवसांत ७ @ तापमान वाढले
By admin | Updated: August 9, 2014 23:27 IST