अमरावती : जिल्हाभरातील शिक्षकांची हक्काची बँक असलेल्या अमरावती जि. प. शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजरंग उधळण्यास सुरुवात झाली आहे. सहकार क्षेत्रातील या निवडणुकीतील राजकारणाप्रमाणे डावपेचाचे पट रंगू लागले आहेत. उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर या निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. ७९५५ मतदार २१ संचालक निवडून देणार असले तरी तूर्तास तब्बल ११४ जण रिंगणात उरल्याने आश्वासनांचा पाऊस पडू लागला आहे.कर्मचारी मतदारांची संख्या शिक्षक मतदारांच्या तुलनेत कमी असल्याने कर्मचारी संवर्गातून निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी प्रचार यंत्रणा राबविणे तुलनेत सोपे आहे. याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी संवर्गामध्ये जबरदस्त चुरस पहावयास मिळत आहे. यावेळी प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे खाजगी स्वीय सहायक आणि जि.प. सदस्यांचे बंधू समोरासमोर ठाकल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. याशिवाय अनेक संगठनांनीही जि.प. कर्मचारी संवर्गात उमेदवार उभे केल्याने सर्वच उमेदवारांना ही निवडणुक कठिण जाण्याचे संकेत आहेत. अर्ज माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
शिक्षक बँक निवडणुकीत राजरंगाची उधळण
By admin | Updated: October 11, 2015 01:40 IST