अमरावती : शहरात स्वाईन फ्लू आजाराने नमुना परिसरातील एक युवक दगावल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच जिल्हा प्रशासन सतर्क झाला आहे. या आजारावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीची बैठक बोलावून वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना योग्य निर्देश दिले. स्वाईन फ्लू रुग्णासाठी टॅमी फ्लू कैप्सूलचा साठा वाढविण्यात आला आहे. शनिवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक अशोक वणकर, पॅथॉलॉजिस्ट विलास जाधव, आरोग्य पर्यवेक्षक एस.डी कपादे, बाह्य संपर्कात असणारे निवासी वैद्यकीय अधिकारी के.बी. देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस. एस. माने, आर. पी. सिरसाट, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी राजूरकर, फार्मसिस्ट माकोडे, परिचारिका ए. एस. सिरसाट तसेच महेंद्र अंबुलाकर बैठकीला उपस्थित होते. स्वाईन फ्लूचा प्रसार शहरात होऊ नये याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी अधिकाऱ्यांना स्वाईन फ्लु आजारावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टॅमी फ्लूचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत २०० टॅमी फ्लूचा साठा उपलब्ध असून महापालिकेजवळ ३०० टॅमी फ्लू आहेत. स्वाईन फ्लू मुळे शहरात एक बळी गेल्याने सर्व शासकीय रुग्णालयांना सतर्क केले.
स्वाईन फ्लू; शासकीय रुग्णालये सज्ज
By admin | Updated: August 9, 2014 23:27 IST